भारतीय मतयंत्रांचे भूतानकडून कौतुक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय बनावटीच्या मतदान यंत्रांची प्रशंसा शेजारच्या भूतान या देशाकडून करण्यात आली आहे. या मतदानयंत्रांमुळे आमच्या देशातील निवडणूक प्रक्रिया सक्षम झाली आहे, अशी भलावण भूतानच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली. भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या एका परिषदेत ते येथे भाषण करीत होते. ही मतदानयंत्र अत्यंत विश्वासार्ह असून निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी त्यांच्यामुळे दूर झाल्या आहेत. आमच्या देशातील निवडणुका या यंत्रांमुळे अधिक पारदर्शी आणि वेगवान झाल्या आहेत, असे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले आहे.
भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत निवडणूक व्यवस्थापन प्राधिकारणांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ही परिषद तीन दिवस चालणार आहे. या परिषदेत भूतानचे मुख्य निवडणूक आयुक्त दाशो सोनाम टोपग्ये यांचे भाषण गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. भारताने भूतानला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पुरविली आहेत. या यंत्रांनी भूतानच्या मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. मतदान प्रक्रिया आणि मतगणना प्रक्रिया या निवडणुकांशी संबंधित असणाऱ्या दोन्ही बाबी या यंत्रामुळे अधिक सुलभ झाल्या आहेत. खर्चाच्या दृष्टीनेही यंत्रे लाभदायक आहेत, असे प्रतिपादन टोपग्ये यांनी केले.
ऑन लाईन मतदानाचाही विचार
भारताप्रमाणेच भूतान या देशानेही निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्धार केला आहे. भविष्यकाळात आमच्या देशात ऑन लाईन मतदानाची सुविधा प्राप्त करुन देण्याचा आमचा विचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने पुरविलेल्या मतदान यंत्रांमुळे मतदारही अधिक संख्येने मतदानाला येऊ लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात विरोधी पक्ष जेव्हा पराभूत होतात, तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांसंबंधी शंका घेऊ लागतात. पण भूतानसारखा देश या यंत्रांची प्रशंसा करतो, ही बाब महत्वपूर्ण आहे, अशी टिप्पणी सोशल मिडियावर अनेकांनी केली आहे.
अन्य देशांमध्येही उपयोग
भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा उपयोग केवळ भूतानमध्ये नव्हे, तर नेपाळ आणि नामिबिया या देशांमध्येही काही प्रमाणात भारतात निर्माण करण्यात आलेल्या मतदान यंत्रांचा उपयोग केला जातो. या देशांनीही या यंत्रांसंबंधीची प्रतिक्रिया सकारात्मक आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.