For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानमध्ये भारतीय पंचावर लैंगिक छळाचा आरोप

06:41 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जपानमध्ये भारतीय पंचावर लैंगिक छळाचा आरोप
Advertisement

महिला हॉकी अधिकारी व हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली,

भारतासाठी अत्यंत लज्जास्पद ठरलेल्या एका घटनेत, हॉकी पंच आणि तांत्रिक अधिकारी गुरिंदर सिंग संघा यांना जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेतून मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान त्यांच्यावर कथित लैंगिक गैरवर्तणुकीच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Advertisement

‘हॉकी इंडिया‘च्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, नागोया येथील वास्तव्यादरम्यान संघा यांनी मलेशियातील एका महिला हॉकी अधिकारी आणि हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केले होते. हो, मलेशियातील एका महिला अधिकाऱ्याने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर संघा यांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. ते दोन दिवसांपूर्वीच परतले आहेत, असे ‘हॉकी इंडिया‘च्या अधिकाऱ्याने नागोयाहून वृत्तसंस्थेला सांगितले. स्पर्धेनंतर ‘हॉकी इंडिया‘ संघा यांच्यावर काही कारवाई करणार का, असे विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की ‘आशियाई हॉकी फेडरेशन‘कडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

आशियाई हॉकी फेडरेशनचा अहवाल प्रतिकूल असेल, तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. यात काहीच शंका नाही. दोषी आढळल्यास त्यांना सोडले जाणार नाही. असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी सामन्यांसाठी पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती आशियाई हॉकी फेडरेशनद्वारे केली जाते. संघा यांच्याविरुद्ध अशा प्रकारची तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, रांची येथे झालेल्या ‘हॉकी इंडिया लीग‘ दरम्यान एका महिला पंचाने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर, ‘हॉकी इंडिया‘ने या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. मात्र, चौकशीदरम्यान संघा यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, असे ‘हॉकी इंडिया‘च्या अधिकाऱ्याने सांगितले. यावर आम्ही समिती स्थापन करून त्या प्रकरणाची चौकशी केली होती, परंतु चौकशी समितीला कोणताही ठोस पुरावा आढळला नाही, असे त्यांनी सांगितले. ‘इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन‘च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा ‘इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन‘च्या किंवा ‘हॉकी इंडिया‘शी काहीही संबंध नाही, कारण अधिकाऱ्यांची नियुक्ती‘आशियाई हॉकी फेडरेशनद्वारे केली जाते.आशियाई क्रीडा स्पर्धेत पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती आशियाई हॉकी फेडरेशनद्वारे केली जाते असे ‘इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. संपर्क साधला असता, नागोया येथील आशियाई हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. भारतीय हॉकीशी संबंधित गैरवर्तणुकीच्या तक्रारींमधील ‘संघ‘ हे प्रकरण सर्वात अलीकडील आहे; याआधी याच वर्षी, राष्ट्रीय महिला संघाच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्यावर छळाचे आरोप झाल्यानंतर ‘हॉकी इंडिया‘ने त्याला पदावरून हटवले होते.

Advertisement
Tags :

.