For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर

06:43 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंकन दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर
Advertisement

मध्यप्रदेशच्या सारांश जैनला कसोटी पदार्पणाची संधी, रवींद्र जडेजाचे पुनरागमन

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी 15 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून मध्यप्रदेशचा फिरकी गोलंदाज सारांश जैनची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

उभय संघातील पहिली कसोटी गॅले येथे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान तर दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबोत खेळविली जाणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ या दौऱ्यात चार दिवसांचा सरावाचा सामना खेळणार असून हा सामना 7 ऑगस्टपासून सुरू होईल. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे संघाचे कर्णधारपद असून केएल राहुल उपकर्णधार आहे.

वॉशिंग्टन सुंदरला स्नायू दुखापत झाल्याने तो या मालिकेसाठी उपलब्ध राहणार नसल्याने निवड समितीने मध्यप्रदेशचा फिरकी गोलंदाज 33 वर्षीय सारांश जैनला संधी दिली आहे. अलिकडेच भारत अ संघाने लंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांतून सारांश जैन 6 गडी बाद केले होते. तसेच फलंदाजीत त्याने नाबाद 70 धावा जमविल्या होत्या.

भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा, मानव सुथार आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचाही समावेश आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या अफगाणविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. मात्र या कसोटी मालिकेपूर्वी काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचणी पुन्हा घ्यावी लागणार आहे. ब्रारने संघातील स्थान राखले आहे. लंका अ विरुद्धच्या सामन्यात ब्रारने 10 गडी बाद केले होते. बुमराह आणि साई सुदर्शन यांना मात्र अद्यापही तंदुरुस्तीची समस्या भेडसावत आहे. बुमराह या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर मात्र विदर्भचा यश ठाकुर आणि जम्मू काश्मिरचा अकिब नबी यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

भारतीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडीक्कल आणि सारांश जैन.

Advertisement
Tags :

.