For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघाचा मालिकाविजय

06:58 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघाचा मालिकाविजय
Advertisement

तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा उडवला धुव्वा : मालिकेत 3-0 ने आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

अभिषेक शर्माची तुफानी खेळी (20 चेंडूत नाबाद 68) आणि कर्णधार सूर्याची त्याला मिळालेली सुरेख साथ (26 चेंडूत नाबाद 57) या जोरावर तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्स आणि 60 चेंडू राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 9 बाद 153 धावा करता आल्या. यानंतर टीम इंडियाने विजयी टार्गेट अवघ्या 10 षटकांतच पार केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील चौथा सामना दि,. 28 रोजी विशाखापट्टणम येथे होईल.

Advertisement

न्यूझीलंडने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात विकेटने झाली, पण अभिषेक व इशानने वादळी फटकेबाजी करत या विकेटचे दडपण येऊ दिले नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी करत भारताच्या गोलंदाजांनी अनपेक्षित विजय मिळवला. संजू सॅमसनला मॅट हेन्रीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले. संजू बाद झाल्यानंतर आलेल्या इशान किशनने 13 चेंडूत 28 धावा फटकावल्या आणि तो माघारी परतला. यानंतर मात्र अभिषेक आणि सूर्याने तुफानी खेळी करत भारताला 10 षटकांत विजय मिळवून दिला. अभिषेकने अवघ्या 14 चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. जे भारताचं टी-20 मधील सर्वात कमी चेंडूत झळकावलेलं दुसरे अर्धशतक आहे. अभिषेकने 20 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या.

न्यूझीलंडचा सलग तिसरा पराभव

प्रारंभी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आपला दम दाखवून न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे (1), रचिन रवींद्र (4) यांना हर्षित राणा व हार्दिकने माघारी पाठवले. त्यानंतर बुमराहने पहिल्याच चेंडूवर टीम सेइफर्टचा (12) त्रिफळा उडवला. यावेळी 34 धावांवर न्यूझीलंडला 3 धक्के बसले होते आणि ग्लेन फिलिप्स व मार्क चॅपमन ही जोडी मैदानावर उभी राहिली. त्यांनी कुलदीप यादवच्या एका षटकात 19 धावा जोडल्या. त्यानंतर दोघांनी चांगली फटकेबाजी करून संघाला 10 षटकांत 75 धावांपर्यंत पोहोचवले. 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बिश्नोईने ही जोडी तोडली. चॅपमनने 23 चेंडूंत 32 धावांचे योगदान दिले. डॅरिल मिचेलला 14 धावांवर हार्दिकने माघारी पाठवले. यानंतर बिश्नोईने 16 व्या षटकात किवींना मोठा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स 40 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 48 धावांवर झेलबाद झाला. याशिवाय, कर्णधार मिचेल सँटेनरने 27 धावांची खेळी साकारली. इतर किवीज फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजासमोर निष्प्रभ ठरले. न्यूझीलंडला 20 षटकांत 9 बाद 153 धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड 20 षटकांत 9 बाद 153 (टीम सेफर्ट 12, ग्लेन फिलिप्स 48, मार्क चॅपमन 32, डॅरिल मिचेल 14, मिचेल सँटेनर 27, बुमराह 3 बळी, रवी बिश्नोई आणि हार्दिक पंड्या प्रत्येकी 2 बळी).

भारत 10 षटकांत 2 बाद 155 (संजू सॅमसन 0, अभिषेक शर्मा 20 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 68, इशान किशन 28, सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 57, मॅट हेन्री आणि ईश सोधी प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.