भारतीय संघाचा आज मंगोलियाशी सामना
एएफसी यू-20 आशियाई चषक स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरण्याचे लक्ष्य, थॉमस चेरियनकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ लाओस
एएफसी 20 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार असून त्यांच्या या मोहिमेचे बचावपटू थॉमस चेरियन नेतृत्व करेल. बुधवारी येथे गट ‘जी’च्या सलामीच्या लढतीत त्यांचा सामना मंगोलियाशी होईल. भारतीय संघ सोमवारी संध्याकाळी व्हिएन्टिनला पोहोचला आणि रात्रीच्या विश्रांतीनंतर प्रशिक्षक रंजन चौधरी यांनी संघाला बोलावून चेरियनला कर्णधार म्हणून घोषित केले.
प्रत्येक गटातील अव्वल संघ आणि गटांतील पाच सर्वोत्तम द्वितीय क्रमांकावरील संघ असे 10 संघ या स्पर्धेसाठी योग्य ठरतील. ‘आमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी चांगली तयारी केली आहे. खेळाडूंची मानसिकता खूप चांगली आहे आणि आम्हाला सकारात्मक मानसिकतेने आमचे काम करायचे आहे’, असे चेरियनने सांगितले. प्रशिक्षक चौधरी म्हणाले की, तीन महिन्यांपासून तयारी चालली आहे आणि प्रत्यक्ष कृतीची तसेच चांगली सुऊवात करण्याची वेळ आली आहे.
खेळाडू आव्हानासाठी तयार आहेत. नक्कीच आमचे उद्दिष्ट प्रथम एएफसी 20 वर्षांखलील आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आहे, जे आमच्या खेळाडूंच्या दृष्टीने एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित करेल. त्या सर्वांसाठीच हा केवळ एक चांगला अनुभव ठरणार नाही, तर तो भारताला या वयोगटात आशियाई स्तरावर नेईल, असेही चौधरी यांनी सांगितले. ‘कोणत्याही स्पर्धेतील पहिला सामना महत्त्वाचा असतो आणि त्यातून आम्हाला तीन गुण मिळतील याची आम्ही खात्री केली पाहिजे’, असे त्यांनी सांगितले.
मंगोलिया ही खूप चांगली बाजू आहे आणि आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. परंतु आम्ही आमचे लक्ष कायम केंद्रीत ठेवण्याचा आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करू, असे प्रशिक्षक चौधरी यांनी सांगितले. भारतापुढे पुढील आव्हान इराण (27 सप्टेंबर) आणि लाओस (29 सप्टेंबर) यांचे असेल. आजचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वा. सुरू होईल.