भारतीय संघाचा बांगलादेश दौरा ऑगस्टमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ येत्या ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळविल्या जाणार आहेत. सदर माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाने मंगळवारी दिली.
2014 नंतर पहिल्यांदाच भारत आणि बांगलादेश यांच्यात द्विपक्षीय टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱ्यातील सामन्यांच्या काही ठिकाणांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. या दौऱ्यातील चार सामने मिरपूरच्या शेर बांगला स्टेडियमध्ये खेळविले जातील तर उर्वरित दोन सामने चेतोग्राममध्ये होतील. उभय संघातील पहिले दोन वनडे आणि त्यानंतर टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने मिरपूरमध्ये आयोजित केले असून तिसरा वनडे आणि पहिला टी-20 सामना चेतोग्राममध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 13 ऑगस्टला ढाक्यात आगमन होईल. उभय संघातील पहिला वनडे सामना 17 ऑगस्टला तर दुसरा वनडे सामना 20 ऑगस्टला होईल. तिसरा वनडे सामना चेतोग्राममध्ये 23 ऑगस्टला खेळविला जाईल. उभय संघातील पहिला टी-20 सामना 26 ऑगस्टला तर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना 29 आणि 31 ऑगस्टला आयोजित केला आहे. आगामी होणाऱ्या आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाला हा दौरा सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा राहिल. अलिकडच्या कालावधीत उभय संघामध्ये विविध स्पर्धांमध्ये चुरशीचे सामने पहावयास मिळाले. त्यामुळे या आगामी दौऱ्यात दोन्ही मालिका चुरशीच्या अपेक्षित आहेत.
दौरा कार्यक्रम
17 ऑगस्ट - पहिला वनडे-मिरपूर
20 ऑगस्ट - दुसरा वनडे-मिरपूर
23 ऑगस्ट - तिसरा वनडे-चेतोग्राम
26 ऑगस्ट - पहिला टी-20-चेतोग्राम
29 ऑगस्ट - दुसरा टी-20-मिरपूर
31 ऑगस्ट - तिसरा टी-20-मिरपूर