भारतीय टे.टे. संघाचे पदक निश्चित
वृत्तसंस्था/ अॅस्टेना
येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस सांघिक चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची महिला टे.टे.पटू ऐहिका मुखर्जी व मनिका बात्रा यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात द. कोरियाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या युबीन आणि जिहे यांचा पराभव केल्याने भारतीय महिला संघाचे या स्पर्धेतील पहिले पदक निश्चित झाले आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऐहिकाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱ्या द. कोरियाच्या आठव्या मानांकित शीन युबीन आणि जिऑन जिहे यांचा ऐहिका मुखर्जी व मनिका बात्रा यांनी एकेरीच्या सामन्यात पराभव केला. ही सांघिक लढत भारताने 3-2 अशा फरकाने जिंकून उपांत्यफेरी गाठली आहे.
ऐहिकाने एकेरीच्या सामन्यात कोरियाच्या युबीनचा 11-9, 7-11, 12-10, 7-11, 11-7, दुसऱ्या एकेरी सामन्यात मनिका बात्राने जिहेचा 12-14, 13-11, 11-5, 5-11, 12-10 असा पराभव करत आपल्या संघला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र तिसऱ्या एकेरी सामन्यात द. कोरियाच्या युनेहीने भारताच्या श्रीजा अकुलाचा पराभव केला. त्यानंतर युबीनने मनिका बात्राचा पराभव करत कोरियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात ऐहिकाने द. कोरियाच्या जिहेवर 7-11, 11-6, 12-10, 12-10 अशी मात करत द. कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बुधवारी खेळविला जाणार आहे.