न्यूझीलंड मालिकेसाठी आज भारतीय संघाची निवड
मोहम्मद सिराज, रिषभ पंतच्या भवितव्याकडे लक्ष, सरफराज खान, ईशान किशन, गायकवाड यांनाही संधीची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवड समिती बडोदा येथे 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविऊद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय एकदिवसीय संघाची निवड आज शनिवारी करणार असून यावेळी रिषभ पंत आणि मोहम्मद सिराज ही जोडी चर्चेचा मुख्य विषय ठरण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला हरवलेल्या संघात मोठे बदल अपेक्षित नसले, तरी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती दोन विशिष्ट चिंतांवर विचार करू शकते.
पहिला मुद्दा पंतच्या दुसरा यष्टीरक्षक म्हणून स्थानाबद्दल असू शकतो, कारण ईशान किशनने झारखंडसाठी मधल्या फळीत आपली फलंदाजीची ताकद दाखवली आहे आणि ध्रुव चंद जुरेलनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी मोठी शतकी खेळी केली आहे. आगरकर असो किंवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, दोघांनीही संघरचना लक्षात घेऊन खेळाडूंची निवड करण्याकडे कल दाखवला आहे. त्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी संजू सॅमसन आणि किशनसारख्या सलामीला येणाऱ्या यष्टीरक्षकांना पसंती दिली आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच यष्टीरक्षकाने प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित असते. पंतच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून जुलै, 2024 ते डिसेंबर 2025 दरम्यान तो फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. आठ वर्षांत केवळ 31 एकदिवसीय सामने आणि 35 पेक्षा कमी सरासरी ही ऊरकीच्या या झुंजार खेळाडूच्या क्षमतेचे खरे प्रतिबिंब दाखवत नाही.
प्रभावाच्या बाबतीत त्याचे सर्वांत मोठे टीकाकारही मान्य करतील की, तो किशन आणि जुरेलपेक्षा सरस आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेविऊद्ध गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या आणि पराभव पत्कराव्या लागलेल्या कसोटी सामन्यातील त्याची फटक्यांची निवड मुख्य प्रशिक्षक किंवा निवड समितीला प्रभावित करू शकलेली नाही. पण त्याला पुरेशी संधी न देता संघातून वगळल्यास काही गैरसोयीचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात.
चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे तीन सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाजांची निवड हा आहे. टी-20 विश्वचषकाचा विचार करून हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड समिती इतर दोन वेगवान गोलंदाजांना म्हणजे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनाही विश्रांती देते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हे दोन्ही गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत खेळले होते. परिस्थितीचा विचार करून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड न झालेला सिराज ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या परदेशातील मालिकेत खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले.
सिराज सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्येही खेळलेला नाही, पण तो शेवटच्या तीनपैकी दोन फेऱ्यांमध्ये हैदराबादकडून खेळू शकतो. 2023 च्या विश्वचषकापर्यंत 50 षटकांच्या सामन्यांसाठीच्या संघात नियमित स्थान मिळाल्यानंतर त्याला वगळण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. मोहम्मद शमीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो बंगालकडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळला आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाबतीत त्याची सर्वोत्तम वेळ निघून गेली आहे, असे मानणारा एक गट आहे.
शमी आणि निवड समिती यांच्यातील संवादही फारसा स्पष्ट राहिलेला नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी सरफराज खान (चौथ्या क्रमांकासाठी) आणि देवदत्त पडिक्कल (सलामीवीर) हे दोन खरे दावेदार आहेत. तथापि, शुभमन गिल, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांचे संघातील स्थान निश्चित असल्याने पडिक्कलला संघात स्थान देणे कठीण होईल. सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून ऋतुराज गायकवाडने त्याच्यापेक्षा पुढे मजल मारली आहे. मात्र जर निवड समितीने आहे तोच संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, तर निवडीवरील सर्व चर्चा या केवळ चहाच्या पेल्यातील वादळ बनून राहतील.