कनिष्ठ चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड
21 जूनपासून बर्लिनमध्ये होणार स्पर्धा, अरायजीत सिंग कर्णधारपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
21 जूनपासून बर्लिनमध्ये सुरू होणाऱ्या कनिष्ठांच्या चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी भारताने 24 सदस्यीय संघाची घोषणा केली असून अनुभवी ड्रॅगफ्लिकर अरायजीत सिंग हुंदालकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात चेन्नई व मदुराई येथे होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी बर्लिनमधील स्पर्धा तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
भारतासह स्पेन, ऑस्ट्रेलिया व यजमान जर्मनी यांचा या चौरंगी स्पर्धेत समावेश आहे. ‘नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या कनिष्ठांच्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा त्याचा एक भाग असेल. बलाढ्या आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध खेळण्याची संधी आपल्या संघाला मिळणार आहे, जी त्यांच्या विकसासाठी उपयुक्त ठरेल,’ असे माजी गोलरक्षक व कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक पीआर श्रीजेश म्हणाले. निकालापेक्षा अव्वल संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव युवा खेळाडूंना मिळावा, यावर अधिक लक्ष केंद्रित असेल. त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करणे यावर आमचा भर आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन, जर्मनी यासारख्या बलाढ्या संघांविरुद्ध स्पर्धा करताना डावपेचात्मक धोरणे, शारीरिक व मानसिक क्षमता या विविध मार्गांनी त्यांना आव्हान मिळणार आहे. अशा अनुभवातूनच जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होत असतात,’ असेही ते म्हणाले.
2023 कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारताने सुवर्ण जिंकले होते, त्या संघाचा हुंदाल हा सदस्य होता. याशिवाय त्याने 2023-24 प्रो लीग हॉकीमध्येही भाग घेतला आहे. डिफेंडर अमिर अली याची उपकर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे. एकेरी राऊंड रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध खेळेल आणि अव्वल दोन स्थाने पटकावणारे संघ अंतिम फेरीत खेळतील तर तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघ वर्गवारीसाठी खेळतील.या स्पर्धेत विविध कॉम्बिनेशन्स आजमावून पाहण्याची संधी मिळणार असल्याचे श्रीजेश म्हणाले.
भारतीय कनिष्ठ हॉकी संघ : गोलरक्षक-बिक्रमजीत सिंग, वेवेक लाक्रा. बचावफळी-अमिर अली (उपकर्णधार), तालेम प्रियोबार्ता, शारदानंद तिवारी, सुनील पीबी, अनमोल एक्का, रोहित, रवनीत सिंग, सुखविंदर. मध्यफळी-अंकित पाल, मनमीत सिंग, रोशन कुजुर, रोहित कुल्लू, थॉकचोम किंगसन सिंग, टी.इंगलेम्बा लुवांग, अद्रोहित एक्का, जीतपाल. आघाडी फळी-अरायजीत सिंग (कर्णधार), गुरजोत सिंग, सौरभ आनंद कुशवाहा, दिलराज सिंग, अर्शदीप सिंग, अजीत यादव. राखीव-आदर्श जी. (गोलरक्षक), प्रशांत बार्ला (बचावफळी), चंदन यादव (मध्यफळी), मोहम्मद कोनायन दाड (आघाडी फळी).