ज्युनियर आशिया कपसाठी भारतीय संघाचे प्रयाण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अलीकडेच झालेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेला पीआर श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारताचा कनिष्ठ हॉकी संघ ज्युनियर आशिया चषक स्पर्धेसाठी गुरुवारी मस्कतला रवाना झाला.
भारतीय कनिष्ठ हॉकी संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. गेल्या वर्षी भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून ज्युनियर आशिया कप विक्रमी चौथ्यांदा पटकावला होता. यावेळी अ गटात असणाऱ्या भारताची सलामीची लढत थायलंडविरुद्ध 27 नोव्हेंबर रोजी होईल. त्यांची पुढील लढत 28 नोव्हेंबर रोजी जपानविरुद्ध, 30 नोव्हेंबर रोजी चिनी तैपेईविरुद्ध होईल आणि गटसाखळीतील शेवटचा सामना कोरियाविरुद्ध 1 डिसेंबर रोजी होईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला आपल्या गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवावे लागेल. पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, ओमान, चीन या संघांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.
विजयी सुरुवात करण्याबाबत विश्वास व्यक्त करताना कर्णधार अमिर अली म्हणाला की, ‘आम्ही कसून तयारी केली असून पुढील आव्हानासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. या स्पर्धेचे आणि मोठ्या स्टेजवर कौशल्य दाखवण्याचे महत्त्व याची आम्हाल सर्वांना पूर्ण जाणीव आहे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करून अंतिम फेरी गाठण्याचा आम्ही प्रयत्न करू,’ असे तो म्हणाला.
या स्पर्धेसाठी आम्ही प्रेरित झालो असल्याचे उपकर्णधार रोहित म्हणाला. ‘खेळाडूंत उत्साह संचारला असून एकीची भावना खेळाडूंत निर्माण झाली आहे. सुलतान जोहोर चषक स्पर्धेतील कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास बळावला आहे. तोच जोम पुढे चालू ठेवण्यावर आमचे लक्ष केंद्रित असेल. प्रत्येक सामन्यात आम्ही कठोर परिश्रम घेण्याचा निर्धार केला असून शिस्तबद्ध आणि क्षमतेला न्याय देणारा परफॉर्मन्स देण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे तो म्हणाला.
भारताने ही स्पर्धा 2004, 2008, 2015 असे तीन वेळा जिंकली असून या स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी संघ बनला आहे. प्रशिक्षक म्हणून माजी गोलरक्षक पीआर श्रीजेशची ही दुसरी स्पर्धा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर संघाने न्यूझीलंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असे हरवून सुलतान जोहोर चषकात कांस्यपदक मिळविले होते.