भारतीय टेटे संघांची विजयी घोडदौड कायम
मनिका बात्रा/ वृत्तसंस्था, लंडन (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या आयटीटीएफ विश्व सांघिक टेबलटेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या दोन्ही संघांनी आपल्या गटातील दुसरी लढत जिंकली आहे.
भारताच्या महिला संघाने युक्रेनचा 3-2 अशा फरकाने पराभव केला तर पुरूषांच्या विभागात भारताने स्लोव्हाकियाचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. भारताच्या महिला संघाने पहिल्या लढतीत युगांडावर विजय मिळविला होता. भारतीय महिला संघाला या लढतीमध्ये पुढे चाल मिळाली. तर भारताच्या पुरूष संघाने पहिल्या लढतीत ट्युनिशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता.
महिलांच्या विभागातील झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये भारताच्या 48 व्या मानांकीत मनिका बात्राने युक्रेनच्या ऑलिम्पियन टेटेपटू ताकियाना बिलेंकोचा 11-9, 7-11, 11-6, 11-5 अशा 3-1 सेट्समध्ये पराभव केला. त्यानंतरच्या पुढील लढतीत युक्रेनच्या मार्गारेटा पिसोत्स्काने भारताच्या यशस्वीनी घोरपडेचा 3-2 (11-7, 11-8, 1-11, 9-11, 11-9) असा पराभव केला. भारताच्या दीया चितळेने दर्जेदार कामगिरी करत युक्रेनच्या व्हेरोनिका मॅटीयुनिनाचा 11-9, 5-11, 11-8, 11-6 अशा सेट्समध्ये पराभव केला. यावेळी दोन्ही संघांची स्थिती 2-2 अशी बरोबरीत होती. भारताच्या यशस्वीनी घोरपडेने बिलेंकोवर 3-1 अशा सेट्समध्ये विजय मिळविला. आता भारतीय महिला संघाची पुढील लढत रवांडा बराब्sार होणार आहे.
पुरूषांच्या विभागात भारताने स्लोक्हाकियाचा 3-2 असा पराभव केला. या लढतीत स्लोव्हाकियाच्या लुबोमिर पिसेटीने भारताच्या मनुष शाहचा 3-2 असा पराभव केला. त्यानंतर मानव ठक्करने जेकुब यांग वेंगचा पराभव केला. भारतीय पुरूष संघाचा पुढील सामना ग्वाटेमालाबरोबर होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 64 देशांचे खेळाडू सहभागी झाले असून ते 4 गटात विभागण्यात आले आहेत.