भारतीय टेबल टेनिस संघास ‘साई’कडून 90 लाखांचा आधार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस संघाने मंगळवारी लंडनमध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या शताब्दी वर्षातील ऐतिहासिक ‘जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत’ आपली सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) 90 लाख रुपयांचा सर्वसमावेशक आधार दिलेला आहे.
ही स्पर्धा 28 एप्रिल ते 10 मे या कालावधीत वेम्बली येथील ओव्हो अरेनामध्ये आयोजित करण्यात आली आहे. 10 खेळाडू, तीन प्रशिक्षक, तीन साहाय्यक कर्मचारी आणि तीन सराव भागीदार यांचा समावेश असलेला 19 सदस्यीय भारतीय चमू या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. यामध्ये मनिका बत्रा, ज्ञानशेखरन साथियन, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यासारखी आघाडीची नावे पुऊष आणि महिला गटांतील स्पर्धांमध्ये भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करत आहेत.
गट फेरीत भारतीय पुऊष संघाची गाठ स्लोव्हाकिया, ट्युनिशिया आणि ग्वाटेमाला यांच्याशी पडणार आहे, तर महिला संघ युक्रेन, युगांडा आणि रवांडा या संघांचा सामना करेल. 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश नसला, तरी लंडन येथील ही जपानमध्ये होणाऱ्या 2026 च्या आशियाई क्रीडास्पर्धेपूर्वी एक उत्तम कस पाहणारी परीक्षा’ ठरेल. तसेच 2030 मध्ये भारतात होणाऱ्या 100 व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत टेबल टेनिसचा पुन्हा समावेश होणार असल्याने या स्पर्धेच्या माध्यमातून भारताची तयारी आणि संघाची राखीव ताकद देखील तपासली जाईल.
या जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाने संघाची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी अनेक सराव शिबिरांना मंजुरी दिली होती. याअंतर्गत 13 ते 19 एप्रिल या कालावधीत बेंगळूर येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या केंद्रात 13.26 लाख ऊ. खर्चून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 21 ते 26 एप्रिल या काळात शेफील्ड येथे परदेशातील प्रशिक्षण शिबिर पार पडले, ज्यासाठी 20.92 लाख ऊपयांचा निधी पुरविण्यात आला होता. देशांतर्गत सराव आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाची सांगड घालणारी ही टप्प्याटप्प्यातील तयारी खेळाडूंची सज्जता अधिक धारदार करण्याच्या आणि प्रशिक्षक मासिमो कॉन्स्टँटिनी यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंना युरोपातील खेळाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. ’साई’ने भारतीय टेबल टेनिस महासंघाला एकूण 60.1 लाख ऊपयांचा निधीही वितरित केला. या निधीमध्ये विमान प्रवास खर्च, निवास व भोजन व्यवस्था, दैनंदिन भत्ते आणि प्रवेश शुल्काचा समावेश आहे.