For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय टेटे संघाचा दुसऱ्या टप्प्यात प्रवेश

06:05 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय टेटे संघाचा दुसऱ्या टप्प्यात प्रवेश
Advertisement

वृत्तसंस्था, लंडन (ब्रिटन)

Advertisement

येथे सुरू असलेल्या आयटीटीएफ विश्व सांघिक पुरूष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला संघांनी आपल्या गटातून प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवित दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या प्राथमिक गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रवांडाचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. तर पुरूषांच्या विभागात भारताने ग्वाटेमालावर शानदार विजय मिळविला.

Advertisement

या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारतीय टेबल टेनिसपटूंनी आपल्या मोहिमेला प्रारंभ करताना त्यांना युगांडा विरुद्ध पुढे चाल मिळाली. त्यानंतर स्टेज 1, बी गट 6 मध्ये झालेल्या दुसऱ्या लढतीत भारतीय महिला संघाने युक्रेनचा पराभव केला. तर पुरूषांच्या विभागातील पहिल्या लढतीत भारताने ट्युनिशियाचा 3-0 तर त्यानंतर झालेल्या दुसऱ्या लढतीत स्लोव्हाकियाचा पराभव करुन स्टेज 1 ब, गट 7 मध्ये आघाडी मिळविली.

रवांडाविरुद्ध झालेल्या लढतीमध्ये भारताची ऑलिम्पिक टेबलटेनिसपटू मनिका बात्राने रवांडाच्या चेनताल हिरवाचा 3-0 अशा सेट्समध्ये (11-3, 11-3, 11-3) त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या दिया चितळेने रवांडाच्या इलेव्हेनी तुमकुंडीचा 3-0 अशा सेट्समध्ये (11-2, 11-1, 11-3) असा पराभव केला. तर सिंड्रेला दासने शेवटचा सामना जिंकून भारताच्या विजयावर 3-0 अशा शिक्कामोर्तब केला.

पुरूषांच्या विभागात भारतीय संघाने ग्वाटेमालाचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडला. पहिल्या सामन्यात भारताच्या जी. साथीयानने ग्वाटेमालाच्या सर्जिओ कॅरेलोचा 3-0 अशा सेट्समध्ये (11-3, 11-2, 11-9) पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या 61 व्या मानांकीत मानव ठक्करने ग्वाटेमालाच्या इयान मोरालेसवर 3-0 (11-4, 11-6, 11-5) अशी मात करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारताच्या पायस जैनने ग्वाटेमालाच्या रिकार्दो गॅटिकाचा 3-0 अशा सेट्समध्ये (11-5, 11-5, 11-6) असा फडशा पाडत ग्वाटेमालाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेमध्ये चार गटांमध्ये एकूण 64 संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा 10 मे रोजी संपणार आहे.

Advertisement
Tags :

.