भारतीय विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नव्या देशांकडे कल
भारतातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी आजही विदेशावर अधिक भर दिसून येतो. विदेशातील शिक्षणाचा पर्याय लक्षात घेतल्यास भारतीय विद्यार्थी हे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड या देशांचीच आजवर उच्च शिक्षणासाठी निवड करत आले आहेत. आता मात्र भारतीय विद्यार्थ्यांचा विदेशात शिकण्याबाबतचा कल काहीसा बदलला असल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात भारतीय विद्यार्थी जर्मनी, रशिया आणि उझबेकिस्तान यासारख्या देशांची निवड उच्च शिक्षणासाठी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
2024 मध्ये पाहता 7 लाख 60 हजार विद्यार्थी भारतातून विदेशात शिक्षणासाठी गेले होते, अशी माहिती आहे. विदेशातील शिक्षणाचा विचार करता अमेरिका हा देश आजही विदेशी शिक्षणासाठी अग्रेसर राहिलेला आहे. मागच्यावर्षी 2 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेतील ही आकडेवारी पाहता 2023 च्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 13 टक्क्यांची घसरण पहायला मिळते. यानंतर इंग्लड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात, असे दिसून आले आहे. कॅनडात विदेशातील विद्यार्थ्यांवर निर्बंध घातल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये तेथे घट पहायला मिळाली आहे. नव्याने जारी केलेल्या निर्बंधामुळे इंग्लंडमध्ये 4 टक्के इतकी कपात भारतीय विद्यार्थ्यांच्याबाबतीत दिसून आली. ऑस्ट्रेलियात 1 लाख 39 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी मागच्यावर्षी तेथे प्रवेश मिळविला होता. या देशात विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 11 टक्के वाढ दिसली. व्हीसा शुल्क वाढविल्यामुळे आणि कडक भाषेसंबंधातील अधिसुचनेमुळे येणाऱ्या काळामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ऑस्ट्रेलियात घसरण पहायला मिळू शकते. या देशांव्यतिरिक्त इतर देशांची निवड आता भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी करु लागले आहेत. यामध्ये जर्मनी, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचा वाटा अधिक पहायला मिळतोय. 2024 मध्ये 35 हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीत शिक्षणाला गेले होते. 2019 च्या तुलनेमध्ये ही संख्या दुप्पट झाली आहे. जर्मनीमधील शैक्षणिक अभ्यासक्रम हे जागतिक स्तरावर गणले जातात. म्हणूनच भारतीय विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी जर्मनीची वाट धरू लागले आहेत. या सोबत रशियात सुद्धा भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यायला जात असल्याचे दिसून आले आहे. 2024 मध्ये 31 हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी रशियात शिक्षणासाठी गेले होते. या देशातही 2019 मधील भारतीय विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता मागच्यावर्षी दुप्पट विद्यार्थी तेथे शिक्षणाला गेले आहेत असे दिसून आले. परवडणारे ट्युशन शुल्क आणि लोकप्रिय वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामुळे भारतीय विद्यार्थी या देशांची निवड आवर्जून करत आहेत. यानंतर उझबेकिस्तानचा विदेशातील उच्च शिक्षणासाठी नंबर लागतो. मागच्यावर्षी 10 हजारहून अधिक विद्यार्थी उझबेकिस्तानमध्ये गेले आहेत. 2019 मध्ये याच देशामध्ये केवळ 300 भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. परवडणारे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम व इतर अभ्यासक्रमांमुळे भारतीय विद्यार्थी तेथे जाऊ लागले आहेत.
भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावरील देशांचा अभ्यास सर्वदृष्ट्या नेहमीच करत असतात. नेहमीप्रमाणे त्याच त्याच देशांची निवड करण्यापेक्षा नव्या देशांचा विचार आता नव्याने होऊ लागला आहे. म्हणून अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये विदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसते आहे. विदेशी उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणासाठी देश निवडताना चांगले मान्यताप्राप्त लोकप्रिय अभ्यासक्रम शिकविले जात असल्याची बाब पाहतानाच येणारा खर्चही आवर्जुन पहात असतात.
-दीपक कश्यप