अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनी 4 वर्षांपासून बेपत्ता
एफबीआयकडून माहिती पुरविणाऱ्याला इनाम
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यू जर्सी प्रांतातून 2019 पासून गायब असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीची माहिती देणाऱ्याला एफबीआयने 10 हजार डॉलर्स (8.32 लाख रुपये) इनाम जाहीर केले आहे. 29 वर्षीय मायूशी भगत ही 29 एप्रिल 2019 पासून बेपत्ता आहे. तिच्या वडिलांनी तिच्याशी अखेरचे 1 मे 2019 रोजी सोशल मीडियावर संपर्क साधला होता. यानंतर कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याविषयी तक्रार नोंदविली होती.
मागील वर्षी जुलै महिन्यात एफबीआयने तिचे नाव ‘किडनॅपिंग/बेपत्ता’ होणाऱ्या व्यक्तींच्या श्रेणीत समाविष्ट केले होते. गुजरातच्या वडोदरा येथे राहणारी मायूशी 2016 पासून स्टुडंट व्हिसावर न्यूयॉर्क इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेत होती. एफबीआयनुसार तिला हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषा अवगत आहे.
एफबीआयने तिची माहिती देण्यासाठी इमर्जन्सी नंबरही जारी केला आहे. मायूशीचा ठावठिकाणा किंवा तिच्या बेपत्ता होण्याशी संबंधित कुठल्याही महत्त्वपूर्ण माहिती पुरविल्यास 10 हजार डॉलर्सचे इनाम दिले जाणार आहे. मायूशीचे वडिल विकास भगत हे वडोदरा महापालिकेत कार्यरत आहेत. विकास भगत यांनी अनेकदा मायूशीला कॉल केला होता परंतु तो तिने रिसिव्ह केला नव्हता.