डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता
न्यूयॉर्क :
अमेरिकेत शिकत असलेली 20 वर्षीय भारतीय वंशाची विद्यार्थिनी सुदीक्षा कोनंकी रहस्यमय पद्धतीने डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये बेपत्ता झाली आहे. डॉमिनिकन रिपब्लिकचे अधिकारी तिचा शोध घेत आहेत. सुदीक्षा कोनंकी गुरुवारपासून बेपत्ता आहे. ती पिट्सबर्ग विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे आणि स्वत:च्या वर्गमित्र-मैत्रिणींसोबत ती स्प्रिंग ब्रेक ट्रिपनिमित्त पुंटा कानाच्या रिसॉर्ट टाउनमध्ये पोहोचली होती. सुदीक्षा कोनंकी समुद्रकिनाऱ्यावर फिरताना बेपत्ता झाली आणि त्यानंतर तिच्याबद्दल कुठलीच माहिती मिळालेली नाही असे डॉमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लाउडाउन काउंटी शेरीफ ऑफिसशी एक युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी संपर्क साधण्यात आला होता. ही युवती डॉमिनिकन रिपब्लिकच्या पुंटा कानामध्ये इतर लोकांच्या समुहासोबत प्रवास करत होती, अशी माहिती लाउडाउन काउंटी शेरिफ ऑफिसच्या प्रवक्त्याने सांगितले. याप्रकरणी पिट्सबर्ग विद्यापीठाने देखील अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. विद्यापीठ विद्यार्थिनीचा परिवार आणि वर्जीनियात लाउडाउन काउंटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. विद्यार्थिनीला शोधण्यासाठी आणि तिला सुखरुप घरी परत आणण्याच्या मोहिमेला पूर्ण समर्थन देत आहोत, असे विद्यापीठाचे प्रवक्ते जॅरेड स्टोनसिफर यांनी नमूद केले आहे.