कजाकिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
एमबीबीएसचे घेत होता शिक्षण
वृत्तसंस्था/ कजान
कजाकिस्तानात एमबीबीएस विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचे नाव उत्कर्ष असून तो मूळचा राजस्थानच्या अल्वर येथील रहिवासी होता. उत्कर्ष कजाकिस्तानच्या सिम कँट युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण होता. मृत्यूच्या काही तासांपूर्वीच उत्कर्षने स्वत:च्या कुटुंबीयांशी फोनवरून संभाषण केले होते. जिममधून स्वत:च्या खोलीत परतल्यावर त्याची प्रकृती बिघडू लागली होती, त्याच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलविले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
कजाकिस्तानच्या डॉक्टरांनी उत्कर्षचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. कजाकिस्तानातून उत्कर्षचे पार्थिव भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावासाकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे त्याचे वडिल डॉ. शैलेंद्र यांनी सांगितले आहे. उत्कर्षच्या कुटुंबाचे दोन सदस्य तातडीने कजाकिस्तानात पोहोचले आहेत. उत्कर्ष हा राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पदकविजेता क्रीडापटू होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.