भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू
वाढदिवसावेळी चुकून स्वत:वर गोळी झाडली
वृत्तसंस्था/ जॉर्जिया
अमेरिकेत एका 23 वषीय भारतीय विद्यार्थ्याने चुकून स्वत:वर गोळी झाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आर्यन रेड्डी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो तेलंगणातील उप्पल येथील रहिवासी आहे. तो जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. आर्यनचे पार्थिव अमेरिकेतून तेलंगणाला रवाना करण्यात आले आहे.
आर्यन रेड्डी हा जॉर्जियाच्या अटलांटा येथील घरी मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत असताना त्याच्यावर चुकून बंदुकीची गोळी लागली. आर्यन रेड्डी याने आपली नवीन बंदूक साफ करण्यासाठी बाहेर काढली होती. यावेळी चुकून गोळी त्याच्या छातीत घुसली. गोळीचा आवाज ऐकून इतर खोलीत असलेले रेड्डी याचे मित्र तेथे पोहोचले असता तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत विव्हळत असताना निदर्शनास आला. मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. रेड्डी याने अमेरिकेत शिकारीसाठी बंदुकीचा परवाना घेतला होता.