भारतीय शेअर बाजार सर्वकालीक उच्चांकावर स्वार
सेन्सेक्स 1384 अंकांनी तेजीसह बंद, निफ्टीचीही 410 अंकांच्या वाढीसह मजबूत कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीवर जोर दिसून आला. राज्यातील विधानसभेतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर सोमवारी प्रामुख्याने पाहायला मिळाला. सेन्सेक्स तब्बल 1300 अंकांनी वाढत बंद झाला. यासोबत निफ्टी निर्देशांकदेखील दमदार तेजीसोबत बंद झाला. बँकिंग, ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1384 अंकांनी वाढत 68865 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 419 अंकांच्या तेजीसह 20686 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी प्रत्येकी दोन टक्के तेजी प्राप्त केली होती. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. बँक निफ्टी निर्देशांक जवळपास 3.50 टक्के इतका वधारलेला दिसला. आयशर मोटर्सचे समभाग सर्वाधिक 7.44 टक्के वाढले होते. या पाठोपाठ अदानी एंटरप्रायसेस 6.78 टक्के, अदानी पोर्ट 6 टक्के आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग 4.50 टक्के वाढले होते. बाजारामध्ये सकाळपासूनच आज दमदार तेजीचा कल दिसत असला तरी ब्रिटानिया, एचडीएफसी लाईफ, एचसीएल टेक, आणि टीसीएस यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले होते. सेन्सेक्स निर्देशांकाची सुरुवातच 928 टक्क्यांच्या तेजीसोबत झालेली होती. निफ्टी निर्देशांकसुद्धा 284 अंकाच्या तेजीसोबत खुला झाला होता. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकामध्ये दमदार तेजी पहायला मिळाली. महत्वाचे म्हणजे बाजारात सकाळपासून सुरू झालेली तेजी अखेरपर्यंत कायम टिकून राहिली. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य 4.9 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. बाजार सुरु होताच पहिल्या 15 मिनिटांत बाजारात 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
सेन्सेक्समध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, एनटीपीसी आणि भारती एअरटेल यांचे समभाग 2 टक्केपेक्षा अधिक वाढले होते. यांना महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि अॅक्सिस बँक यांनी तेजी दाखवत मदत केली. नेस्ले कंपनीचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले होते.