युद्ध तणावाने भारतीय शेअरबाजारात पुन्हा घसरण
सेन्सेक्स 479 अंकांनी घसरला, मेटल, रियल्टी, प्रायव्हेट बँक निर्देशांक घसरणीत : कच्चे तेल वाढले
मंगळवारी भारतीय शेअरबाजारात घसरणीचा अनुभव चाखायला मिळाला. सोमवारी बाजारात चांगली तेजी राहिली होती. मेटल, रियल्टी आणि प्रायव्हेट बँकिंग समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता.
त. भा. मुंबई
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 479 अंकांच्या घसरणीसह 76009 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 118 अंकांनी घसरत 23913 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्के व स्मॉलकॅप निर्देशांक 0.35 टक्के इतका तेजीत होता. एफएमसीजी व मेटल वगळता इतर सर्व निर्देशांक नुकसानीसह बंद झाले. पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक, रियल्टी व कंझ्युमर ड्युरेबल्स यांचे निर्देशांक 0.5 ते 1 टक्का इतके घसरणीत हेते.
हे समभाग तेजीत
शेअरबाजारात अदानी पोर्ट, टाटा मोटर्स पीव्ही, टेक महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. नेस्ले, इटर्नल, सिप्ला, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो, सनफार्मा, टाटा स्टील, एसबीआय, लार्सन टुब्रो, ओएनजीसी यांचे समभागही मजबुतीसोबत बंद झाले आहेत.
हे समभाग घसरणीत
घसरणीत पाहता अपोलो हॉस्पिटल, विप्रो व भारती एअरटेल या समभागांचा समावेश होता. टीसीएस, ट्रेंट, ग्रासिम, इंडिगो, जियो फायनान्स, कोल इंडिया, मॅक्स हेल्थकेअर, महिंद्रा आणि महिंद्रा, अॅक्सिस बँक, डॉ. रे•िज लॅब्ज, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी लाइफ, टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, श्रीराम फायनान्स, बीईएल, एशियन पेंटस् यांचेही समभाग कमकुवत होत बंद झाले होते.
जागतिक बाजारातले चित्र
आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. दक्षिण कोरीयाचा कोस्पी निर्देशांक 2.55 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 0.25 टक्के घसरलेला होता तर हाँगकाँगचा हँगसेंगसुद्धा 0.03 टक्के घसरणीत होता.
जियोजीत इन्वेस्टमेटचे विनोद नायर म्हणाले की अमेरिका व इराण यांच्यात शांती वार्ताबाबत जो थोडाफार दिलासा होता तो दक्षिण इराणमधील अमेरिकेच्या हल्ल्याने धुळीस मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा युद्धाच्या तणावाने बाजारात चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाचे दर मंगळवारी वाढलेले पहायला मिळाले तर रुपया कमकुवत झाला होता.