भारतीय शेअरबाजाराचा आठवड्याचा शेवट गोड
सेन्सेक्स 1300 अंकांनी तेजीत : ट्रम्प धोरणाचा परिणाम
मुंबई :
अमेरिकेतील ट्रम्प सरकारने चीनवगळता इतर देशांवरील शुल्क आकारणी तुर्तास 90 दिवसांसाठी थांबवली असून या वातावरणात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजार तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1310 अंकांनी दमदारपणे वाढत 75157 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 429 अंकांनी वधारत 22828 च्या स्तरावर बंद झाला. एनएसईवरील 50 समभागांपैकी 46 कंपन्यांचे समभाग तेजी समवेत बंद झाले. विविध निर्देशांकांनीही शुक्रवारी उत्तम कामगिरी केली. यात धातू निर्देशांक अधिक चमकताना दिसला. धातु निर्देशांक 4.09 टक्के वाढीसोबत बंद झाला. तर कंझ्युमर ड्युरेबल्स 3.19 टक्के, फार्मा 2.43 टक्के, ऑइल अँड गॅस 2.20 टक्के आणि ऑटो निर्देशांक 2.03 टक्के इतका वधारत बंद झाला होता.
हे समभाग वधारले
शुक्रवारी सकाळपासूनच सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक चांगल्या तेजीसोबत सुरु झाले होते. याला विविध क्षेत्राच्या निर्देशांकांनी तेजी राखत आधार दिला. विविध समभागांची कामगिरी पाहता हिंडाल्कोचे समभाग सर्वाधिक 6.44 टक्के वाढत 600 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. तर टाटा स्टीलचे समभाग 4.91 टक्के वाढत 133 रुपये, जेएसडब्ल्यू स्टीलचे 4.73 टक्के वाढत 990 च्या स्तरावर बंद झाले. कोल इंडिया व जियो फायनॅन्शीयलचे समभाग अनुक्रमे 4.68 टक्के, 4.12 टक्के वाढलेले दिसले.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे 50 पैकी 3 समभाग घसरणीत होते. अपोलो हॉस्पिटलचे समभाग 0.78 टक्के घसरत 6781 रुपयांवर तर एशियन पेंटस्चे समभाग 0.73 टक्के घसरत 2394 च्या स्तरावर बंद झाले. याखेरीज आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे समभागही घसरणीत होते, जे 0.47 टक्के घसरत 3232 रुपयांवर बंद झाले. जागतिक बाजारावर नजर फिरवल्यास अमेरिकेतील डो जोन्स 1015 अंकांनी, नॅस्डॅक कंपोझीट 738 अंक आणि एस अँड पी-500 189 अंकांनी घसरणीत होता. आशियात जपानचा निक्केई 2.96 टक्के, कोरीयाचा कोस्पी 0.50 टक्के घसरणीत राहिला.