भारतीय शेअरबाजार अल्पशा तेजीसमवेत बंद
सेन्सेक्स 234 अंकांनी तेजीत, ओएनजीसीचे समभाग वधारले
मुंबई :
सोमवारी चीनमधील नव्या व्हायरसच्या भीतीपोटी गुंतवणुकदारांनी विक्री केल्याने शेअरबाजार मोठ्या प्रमाणात कोसळला होता. मंगळवारी मात्र शेअरबाजार काहीशा तेजीसमवेत बंद झालेला पहायला मिळाला. निफ्टी 91 अंकांनी तेजीत राहिला होता. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 234 अंक किंवा 0.30 टक्के वाढीसोबत 78199 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 91 अंक किंवा 0.39 टक्के वाढीसोबत 23707 च्या स्तरावर बंद झाला. सोमवारी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीवर जोर देण्यात आला होता. पीएसयू क्षेत्रातील कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे बाजार काहीसा वाढत बंद झाला.
हे समभाग वधारले
निफ्टीमधील तेल उत्पादक कंपनी ओएनजीसी यांचे समभाग सर्वाधिक वाढीत असलेले पहायला मिळाले. समभाग 3.59 टक्के वाढत 263 रुपयांवर बंद झाले. यासोबतच एसबीआय लाईफचे समभाग 3 टक्के वाढत 1478 रुपयांवर, एचडीएफसी लाईफचे समभाग 2.3 टक्के वाढत 619 रुपयांवर, टाटा मोटर्सचे समभाग 2.20 टक्के वाढत 793 रुपयांवर बंद झाले. भांडवलमूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीचे समभागदेखील 1.88 टक्के वाढत 1241 रुपयांवर बंद झाले. यांच्या सोबत लार्सन टूब्रो, कोल इंडिया, एनटीपीसी, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, सन फार्मा, बजाज फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, स्टेट बँक, एशियन पेंटस् यांचे समभागसुद्धा वाढत बंद झाले.
हे समभाग घसरले
दुसरीकडे घसरणीमध्ये आयटी क्षेत्रातील समभागांचा वाटा मोठा होता. एचसीएल टेकचे समभाग 1.91 टक्के घसरत 1916 रुपयांवर बंद झाले. यासोबत टेंटचे समभाग 1.78 टक्के कमी होत 6874 रुपये, टीसीएसचे समभाग 1.63 टक्के घसरत 4028 रुपयांवर, आयशर मोटर्सचे समभाग 1.39 टक्के घसरत 5177 च्या स्तरावर बंद झाले.