भारतीय क्रीडाविश्व विनेश फोगाटच्या पाठीशी
क्रीडा लवादाचा निर्णय निराशाजनक, पण ती आमच्यासाठी आहे चॅम्पियन’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या ऑलिम्पिक अपात्रतेविऊद्ध केलेले अपिल फेटाळण्याच्या क्रीडा लवादाच्या (सीएएस) निर्णयावर भारतीय क्रीडाविश्वाने निराशा व्यक्त केली. परंतु ती आमच्यासाठी चॅम्पियनच राहील, असे त्यांनी म्हटले आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटाच्या फायनलमधून 100 ग्रॅम जास्त वजन असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध विनेशचे अपिल क्रीडा लवादाच्या अस्थायी विभागाने बुधवारी फेटाळले. यामुळ रौप्यपदक मिळवण्याच्या तिच्या आशा धुळीस मिळाल्या.
पॅरिस गेम्समध्ये भारतीय हॉकी संघाला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पी. आर. श्रीजेशने त्याबद्दल बोलताना सांगितले की, हे निराशाजनक आहे पण आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने दावा केला की, विनेशकडून पदक हिसकावण्यात आले आहे. ‘मला वाटते की, या अंधारात तुझे पदक हिसकावले गेले. तू आज संपूर्ण जगात हिऱ्यासारखी चमकत आहेस’, असे त्याने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
विनेश आणि साक्षी मलिक यांच्यासह पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. ‘विश्वविजेती, हिंदुस्थानचा अभिमान, ऊस्तम-ए-हिंद विनेश फोगट तू देशाचा कोहिनूर आहेस. विनेश फोगट जगभरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यांना पदके हवी आहेत, ते प्रत्येकी 15 ऊपयांनाही ती विकत घेऊ शकतात’, असे पुनियाने विनेशच्या अनेक पदके घातलेल्या छायाचित्रासह नमूद केले आहे.
ही दु:खद बातमी आहे पण आम्ही यावर काय बोलू. एक खेळाडू अत्यंत कठोर परिश्रम करतो आणि असे काही कुणासोबत घडले, तर तो दुखावून जातो. आमच्यासाठी विनेश एक स्टार आहे आणि नेहमीच राहील, असे हॉकीपटू जर्मनप्रीत सिंगने म्हटले आहे. त्याचा सहकारी अमित रोहिदासने म्हटले आहे की, संपूर्ण भारत विनेशसोबत आहे. ती आमच्यासाठी आणि देशासाठी चॅम्पियन आहे.
राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांनी क्रीडा लवादाच्या अस्थायी विभागाचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. निर्णय आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला खूप आशा होती. पण हे भारतीय कुस्ती आणि देशाचे दुर्दैव आहे, असे उद्गार त्यांनी काढले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी देखील या निर्णयाने धक्का बसल्याचे सांगून त्यावर निराशा व्यक्त केली होती.