विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय रायफल-पिस्तूल नेमबाज सज्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
स्पेनमधील ग्रेनाडा येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन’च्या (आयएसएसएफ) रायफल-पिस्तूल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी रविवारी खेळाडूंचे आगमन झाले. सोमवारपासून ‘लास गॅबियास शूटिंग रेंज’वर सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अनेक दिग्गज आणि आघाडीचे नेमबाज आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या हंगामातील या पहिल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय पिस्तूल आणि रायफल नेमबाज एका दृढअंनिश्चयाने सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी गाजवलेले वर्चस्व कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे. गतवर्षी या नेमबाजांनी यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले होते आणि त्यांनी भाग घेतलेल्या जवळपास प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती.
मोरोक्को येथे झालेल्या ‘शॉटगन विश्वचषक’ स्पर्धेत हंगामाची सुऊवात निराशाजनक झाली. तिथे भारताची कामगिरी अत्यंत विसरण्याजोगी राहिली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष पिस्तूल आणि रायफल या प्रकारांकडे वळले आहे. हे असे क्रीडाप्रकार आहेत ज्यात भारताने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑलिम्पियन नेमबाज रिदम सांगवान, अंजुम मौदगिल आणि मेहुली घोष यांच्यासह देशातील काही सर्वोत्तम नेमबाजांचा संघात समावेश असल्याने हा भारतीय संघ एका नव्या आणि विजयी मानसिकतेसह स्पर्धेत उतरण्यास अत्यंत उत्सुक आहे.
तथापि, या संघात दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर आणि विश्वविजेता सम्राट राणा यांच्या अनुभवाची उणीव भासेल. कारण या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात त्यांचा समावेश नाही. राष्ट्रीय महासंघाच्या ‘रोटेशन’ धोरणानुसार राष्ट्रीय संघातील सर्व सदस्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार मनू भाकर, सुऊची इंदर सिंग आणि सम्राट यासारखे दिग्गज पिस्तूल नेमबाज मे महिन्यात म्युनिक येथे होणाऱ्या पिस्तूल-रायफल विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतील. त्या स्पर्धेत भारतीय नेमबाजी क्षेत्रातील जवळपास सर्वच दिग्गज खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तरीही, हंगामातील या पहिल्या पिस्तूल-रायफल विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या भारतीय संघात ‘स्टार पॉवर’ची कोणतीही कमतरता नाही.