हुथींच्या ताब्यातून भारतीयाची सुटका
पाच महिन्यांपासून बंदिवान : बचावासासाठी ओमानची मदत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर येमेनमध्ये पाच महिने बंदिवान असलेल्या भारतीय खलाशी अनिल कुमार रवींद्रन यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. केरळचे रहिवासी अनिल कुमार रवींद्रन हे एमव्ही इटर्निटी सी या मालवाहू जहाजाचे क्रू मेंबर असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. 7 जुलैपासून त्यांना हुथी बंडखोरांनी ताब्यात घेतले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रवींद्रन यांच्या सुटकेचे स्वागत केले. ते मंगळवारी मस्कत येथे पोहोचले असून आता लवकरच भारतात परतणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
युद्धग्रस्त येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी ताब्यात घेतलेल्या एका भारतीय नागरिकाची सुटका करण्यात विविध यंत्रणांचा हातभार लागला. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अधिकृतपणे याची पुष्टी केली. रवींद्रन यांची सुरक्षित सुटका आणि मायदेशी परतफेड सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार विविध यंत्रणांशी सतत समन्वय साधत आहे. ही सुटका करण्यात भारत सरकार ओमानच्या प्रशासनाचे आभार मानत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केरळमधील पाथीयूर येथील रहिवासी असलेले अनिल रवींद्रन हे लायबेरियाच्या ध्वजांकित मालवाहू जहाज एमव्ही इटर्निटी सीच्या क्रूचा भाग होते.
यावर्षी 7 जुलै रोजी हुथी बंडखोरांनी जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यामुळे जहाज बुडाले आणि चार क्रू सदस्य ठार झाले. याचदरम्यान हुथी बंडखोरांनी रवींद्रन यांना ओलीस ठेवले होते. अन्य दहा जणांनाही हुथी बंडखोरांनी ताब्यात घेतले होते. आता बुधवारी हुथी बंडखोरांनी येमेनमध्ये बंदिवान असलेल्या अनिल रवींद्रन यांच्यासह सर्व 11 खलाशांची सुटका केली. त्यांना येमेनची राजधानी सना येथून विशेष रॉयल ओमान एअर फोर्स विमानाने मस्कतला पाठवण्यात आले.
हुथी बंडखोर गेल्या वर्षीपासून लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 100 हून अधिक जहाजांवर क्षेपणास्त्रs आणि ड्रोनने हल्ला केला आहे. यातील चार जहाजे बुडाली असून किमान नऊ खलाशांना ठार मारले आहे. या हल्ल्यादरम्यान अनेक क्रू मेंबर्सना कित्येक महिन्यांपासून ओलीस ठेवण्यात आले आहे.