43 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नॉर्वेमध्ये
वृत्तसंस्था/ ओस्लो
आपल्या पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पोहोचले. 43 वर्षांनंतर नॉर्वेला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. विमानतळावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीनंतर आता भारत-नॉर्वे मैत्रीत नवी ऊर्जा निर्माण होईल, असा आशावाद दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. मोदी नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम आणि राणी सोन्जा यांचीही भेट घेतली.
चार दशकांहून अधिक काळानंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी नॉर्वेला भेट दिल्यामुळे द्विपक्षीय संबंध आणि विश्वास दृढ होण्यास मदत होणार आहे. या भेटीनंतर आता पंतप्रधान मोदी मंगळवारी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तिसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद 19 मे रोजी ओस्लो येथे होणार आहे. या शिखर परिषदेत नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आइसलँडचे नेते सहभागी होणार आहेत. भारत-नॉर्डिक शिखर परिषद प्रथम 2018 मध्ये स्टॉकहोम येथे आणि दुसरी 2022 मध्ये कोपनहेगन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन, संरक्षण सहकार्य, हवामान बदल आणि आर्क्टिक धोरण यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हा दौरा मोदींच्या पाच देशांच्या दौयाचा चौथा टप्पा आहे. त्यांनी यापूर्वी यूएई, नेदरलँड्स आणि स्वीडनला भेट दिली आहे. आता नॉर्वेनंतर ते इटलीला जाणार आहेत.
नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत मोदींची द्विपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा आणि जागतिक समस्यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भारत-नॉर्वे संबंध अधिक दृढ करण्यावरही चर्चा झाली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील व्यापार अंदाजे 2.73 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. दरम्यान, नॉर्वेच्या सार्वभौम संपत्ती निधीने भारतीय बाजारपेठेत अंदाजे 28 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. भारत आणि संपूर्ण नॉर्डिक प्रदेशातील एकूण व्यापार अंदाजे 19 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे.
भारतीय समुदायाकडून ओस्लोमध्ये मोदींचे स्वागत
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आगमन झाल्यावर मोदींनी भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर मोठी गर्दी जमली होती. पंतप्रधान मोदींनी हॉटेलबाहेर उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाला आणि इतरांना अभिवादन केले. लोकांनी ‘मोदी, मोदी!’च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. अनेकजण भारतीय झेंडे आणि पोस्टर्स घेऊन आले होते.
स्वीडनच्या दौऱ्यात दहशतवादावर प्रहार
पंतप्रधान मोदींनी रविवारी स्वीडनमधील गोटेबर्ग येथे आयोजित युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संबोधित करताना दहशतवादावर चिंता व्यक्त केली. सध्याच्या तणावपूर्ण जागतिक वातावरणात भारत आणि स्वीडनसारख्या लोकशाही देशांमधील घनिष्ठ सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर धोका आहे, यावर भारत आणि स्वीडन सहमत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे आभारी आहोत. आम्ही दहशतवादाविरुद्ध आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा सुरूच ठेवू, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.