कॅनडात भारतवंशीय खासदाराचा पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल
चंद्रा आर्य यांनी संसदेत कानडीमधून दिले भाषण
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडात जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य हे कॅनडाचे आगामी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत अधिकृतपणे सामील झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांनी कानडी भाषेत सभागृहाला संबोधित केले. चंद्रा आर्य हे मूळचे कर्नाटकातील तुमकुर जिह्यातील आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.
चंद्रा आर्य हे कॅनडातील नेपियन येथील संसद सदस्य आहेत. आपल्या वारशाबद्दल अभिमान व्यक्त करत आर्य यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची घोषणा केली होती. कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना, ‘कर्नाटकातील तुमकुर जिह्यातील शिरा तालुक्यातील एका व्यक्तीची कॅनडात संसद सदस्य म्हणून निवड होणे आणि आता एका देशाच्या सभागृहामध्ये कानडीमध्ये बोलणे हा सुमारे पाच कोटी कर्नाटकवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे’ असे आर्य म्हणाले.
लिबरल पक्षाच्या बैठकीपूर्वी चंद्रा आर्य यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अलिकडेच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपल्या भावना मांडल्या होत्या. मी कॅनडाच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवत आहे. आपल्या देशाला संरचनात्मक आव्हानांचा सामना करावा लागत असल्यामुळे ठोस उपायांची आवश्यकता आहे. आपल्या मुलांचे आणि भावी पिढ्यांच्या समृद्धीसाठी आपण धाडसी राजकीय निर्णय घेतले पाहिजेत, असे ट्विट त्यांनी केले होते.
चंद्रा आर्य यांची ओळख
चंद्रा आर्य हे मूळचे कर्नाटकमधील राहिवासी आहेत. एमबीए पूर्ण केल्यानंतर 2006 मध्ये ते कॅनडाला गेले. 2015 पासून ते नेपाळचे खासदार आहेत. त्यांना अभियांत्रिकी आणि वित्त या विषयांचा चांगला अभ्यास आहे. यापूर्वी ते एका उच्च-तंत्रज्ञान संरक्षण तंत्रज्ञान कंपनीत गुंतवणूक सल्लागार आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम करत होते. ते कॅनडातील हिंदू समुदायाचे समर्थक असून वादग्रस्त मुद्यांवर त्यांनी वेळोवेळी कठोर भाष्य केलेले आहे. खलिस्तान समर्थक निदर्शकांचाही यापूर्वी त्यांनी निषेध केला आहे.