अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर पत्नीच्या हत्येचा आरोप
सॅक्रामेंटो : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भारतीय वंशाचा युवक गुरिंदर गिल (28 वर्षे) याला पत्नी जॅस्मिन गिल (30 वर्षे) हिच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पत्नीला अमेरिकन इमिग्रेशन यंत्रणा आयसीईने ताब्यात घेतल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली होती. मात्र, तपासात या दाव्याला पुष्टी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले. गुरिंदर आणि जॅस्मिन हे सॅक्रामेंटो येथे राहत होते. पती-पत्नीमध्ये घटस्फोट आणि मुलाच्या ताब्यावरून वाद सुरू होता. याच पार्श्वभूमीवर जॅस्मिन बेपत्ता झाल्यानंतर गुरिंदरने ती आयसीईच्या ताब्यात असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित यंत्रणेकडे चौकशी केली असता अशाप्रकारची कोणतीहीय कारवाई झाल्याची माहिती मिळाली नाही. 1 ऑक्टोबर रोजी एल डोराडो काउंटीमध्ये जळालेल्या मानवी मृतदेहाचे अवशेष आढळले. हे अवशेष जॅस्मिन यांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जॅस्मिन या भारतीय नागरिक होत्या असे समजते.
