भारताच्या अधिकाऱ्यांवर कॅनडात हेरगिरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडात नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय व्यापारी दूतावासांच्या अधिकाऱ्यांवर गुप्त कॅमेरे आणि ऑडिओ साधनांच्या साहाय्याने ‘लक्ष’ ठेवण्यात येत आहे. कॅनडाच्या प्रशासनानेच ही सूचना दिली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे. या अधिकाऱ्यांचे खासगी दूरध्वनी संभाषणही ‘ऐकले’ जात आहे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे.
राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या एका लेखी उत्तरात ही बाब उघड केली. कॅनडातील व्हँक्यूव्हर येथे असणाऱ्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना अशा प्रकारची सूचना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर एकप्रकारे ही हेरगिरीच होत आहे. भारताने या संदर्भात आपला तीव्र आक्षेप कॅनडाकडे नोंदविला आहे.
भारतीय अधिकाऱ्यांना त्रास
कॅनडाचे प्रशासन अशाप्रकारे भारतीय अधिकाऱ्यांना त्रास देत आहे. त्यांना घाबरविण्याचा हा प्रयत्न आहे. काही ‘तांत्रिक’ कारणांमुळे हे केले जात आहे, अशी मखलाशी जरी कॅनडाने केली असली तरी अशाप्रकारे या कृतीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. कॅनडाच्या या कृत्यामुळे आधीच तणावग्रस्त असणारे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच चिघळतील, असा इशारा भारताने दिला आहे.
कॅनडाची नकारात्मक भूमिका
कॅनडाने अलिकडच्या काळात सातत्याने भारताच्या विरोधात नकारात्मक भूमिकेचे प्रदर्शन केले आहे. या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने भारताविरोधात कोणताही पुरावा नसताना गंभीर आरोप केले आहेत. भारताविरोधात अवमानकारक भाषेचा उपयोग केला आहे. भारताच्या अधिकाऱ्यांना किमान सुरक्षा पुरविण्यासही या देशाने नकार दिला आहे. दोन्ही देशांमधील तणावग्रस्त संबंध सुधारण्याचा प्रयत्न भारताने हरप्रकारे केला असला, तरी कॅनडाचा प्रतिसाद थंडा आहे, असेही राज्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये शुक्रवारी स्पष्ट केले आहे.