अमेरिकेत भारतीय नर्सला प्रचंड मारहाण
चेहऱ्याच्या हाडांना फ्रॅक्चर : दृष्टी गमाविण्याचा धोका
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका 33 वर्षीय इसमाने भारतीय वंशाची 66 वर्षीय नर्सला निर्दयी मारहाण केली आहे. या हल्ल्यात नर्सच्या चेहऱ्यावरील एक हाड तुटले असून दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमाविण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी पोहोचले असता त्याने भारतीय वाईट असतात, मी आताच एका भारतीय डॉक्टराला प्रचंड मारहाण केल्याचे सांगितले.
न्यायालयाने संबंधित ईसमाला द्वेषयुक्त गुन्हा आणि सेकंड डिग्री मर्डरप्रकरणी दोषी मानले आहे. हल्लेखोराचे नाव स्टीफन स्कँटलबरी असून तो फ्लोरिडा पाम्स वेस्ट साइड रुग्णालयाच्या सायकियाट्रिक वॉर्डमध्ये भरती होता. याच रुग्णालयात लीलम्मा लास नर्स म्हणून कार्यरत होत्या. लीलम्मा यांच्यावर हल्ला केल्याच्या काही वेळातच स्टीफनला अटक करण्यात आली. आरोपी तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत स्वत:च्या बेडवर असताना लीलम्मा त्याचे चेकअप करण्यासाठी पोहोचल्या होत्या, तेव्हा अचानक त्याने बेडवरून उडी घेत लीलम्मा यांच्यावर हल्ला केला. खोलीत उपस्थित अन्य व्यक्ती मदत मिळविण्यासाठी बाहेर पळाला. तोपर्यंत स्टीफन लीलम्मा यांच्या शरीरावर बसून त्यांना ठेस लगावत होता. हा प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लीलम्मांच्या मेंदूत रक्तस्राव
लीलम्मा यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या हिस्स्यातील सर्व हाडं तुटली होती. त्या बेशुद्ध पडल्या होत्या अशी माहिती त्यांच्या कन्या सिंडी जोसेफ यांनी दिली आहे.
स्टीफन मानसिक रुग्ण
स्टीफन हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी भय अन् भ्रमाच्या स्थितीत होता असा दावा त्याची पत्नी मेगन स्कँटलबरी यांनी केला. आरोपीला स्वत:वर कुणी पाळत ठेवून असल्याचा भ्रम झाला होता. त्याने स्वत:ची पत्नी आणि शेजारीही स्वत:वर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला होता. स्कँटलबरीच्या वकिलाने सिझोफ्रेनियापासून एक्यूट सायकोसिस (गंभीर मानसिक आजार) यासारख्या स्थितींचा दाखला देत आरोपीने भारतीय वंशाच्या महिलेवर वंशद्वेषातून हल्ला केला नाहीत र मानसिक अस्थिरतेपोटी केला असल्याचा युक्तिवाद केला होता.