भारतीय नौदलाला मिळणार नवी पाणबुडी
नौदलाचे सागरी सामर्थ्य वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाला पुढील महिन्यात आणखी एक पाणबुडी प्राप्त होणार आहे. कलवरी श्रेणीची ही पाणबुडी वागशीर प्रोजेक्ट-75 अंतर्गत निर्मित सहावी आणि अखेरच पाणबुडी असेल. नौदलासाठी एअर इंडिपेंडेंट प्रपल्सन (एआयपी) सिस्टीमयुक्त पाणबुडी तयार करण्यासाठी प्रोजेक्ट-75आय वरील कामही पुढे सरकले आहे. याच्या अंतर्गत नौदलाला 6 पाणबुडी मिळणार आहेत. एआयपीमुळे या पाणबुडी अधिक कालावधीपर्यंत पाण्यात राहू शकणार आहेत. कुठल्याही दीर्घ तैनात आणि युद्धसदृश स्थितीसाठी हे आवश्यक आहे.
नौदलाकडे सध्या एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन सिस्टीमयुक्त कुठलीच पाणबुडी नाही. एल अँड टी आणि एमडीएल दोन्हीपैकी कुठल्याही एका कंपनीला प्रोजेक्ट-75 आयसाठी निवडले जाणार आहे. पाणबुडीसाठी तांत्रिक आणि फील्ड मूल्यांकन झाले आहे. आता स्टाफ मूल्यांकन सुरू असुन ज्यानंतर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर केला जाईल आणि मंत्रालयाच्या मंजुरीनंतर करार वाटाघाटी समिती यावर पुढील निर्णय घेणार आहे. तेथून मंजुरी मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीकडून हिरवा कंदील घेतला जाणार आहे. एखाद्या कंपनीसोबत करार झाल्याच्या 3-4 वर्षांनी या पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात सामील होण्यास सुरुवात होईल.
मागील महिन्यात दोन पाणबुडींच्या निर्मितीला मंजुरी
नौदलासाठी मागील महिन्यात सुरक्षा विषयक समितीने दोन स्वदेशी न्युक्लियर अटॅक सबमरीनच्या (एसएसएन) निर्मितीला मंजुरी दिली आहे. एसएसएन अटॅक पाणबुडी असली तरीही यात अण्वस्त्रs नसतात. आण्विक पाणबुडी दोन प्रकारच्या असतात. न्युक्लियर अटॅक सबमरीन (एसएसएन) आणि न्युक्लियर मिसाइल सबमरीन (एसएसबीएन) असे दोन प्रकार असतात. एसएसनमध्ये अण्वस्त्रs नसतात, ही पाणबुडी पारपंरिक पाणबुडीप्रमाणेच असते, परंतु यात ऊर्जा आण्विक इंधनाद्वारे प्राप्त होते. यामुळे ही पाणबुडी पारंपरिक पाणबुडीच्या तुलनेत अधिक शक्तिशाली असते. तसेच दीर्घ कालावधीपर्यंत खोल पाण्यात संचार करू शकते. पाण्यात 60 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने या पाणबुडी प्रवास करू शकतात.
भारताकडे दोन आण्विक पाणबुडी
भारताकडे सध्या दोन आण्विक पाणबुडी आहेत. आयएनएस अरिहंतला 2009 मध्ये नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते. एसएसबीएन आयएनएस अरिघात काही महिन्यांपूर्वी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. तर आणखी दोन न्युक्लियर सबमरीनवर काम सुरू आहे.