भारतीय नौदलाने वाचविला 19 पाक खलाशांचा जीव
सागरी चाच्यांच्या तावडीतून केले मुक्त
वृत्तसंस्था/ पोरबंदर
भारतीय नौदलाने समुद्रात 19 पाकिस्तानी खलाशांना सोमालियन सागरी चाच्यांच्या तावडीतून सोडविले आहे. सागरी चाच्यांच्या वावरासंबंधी माहिती मिळताच भारतीय नौदलाने तातडीने कारवाई करत पाकिस्तानी खलाशांचा जीव वाचविला आहे. नौदलाने पूर्व सोमालियानजीक मासेमारी करणारी नौका ‘अल नईमी’ आणि त्याच्या चालक दलाला वाचविले आहे.
सुमित्रा ही भारतीय नौदलाची स्वदेशी तटरक्षक नौका आहे. या नौकेला सोमालिया आणि एडनच्या आखातात सागरी चाचेगिरी रोखण्यासाठी सागरी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. यापूर्वी 28 जानेवारी रोजी इराणी नौका ‘इमान’चे अपहरण झाल्याचा संदेश मिळताच भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली होती. सागरी चाच्यांनी चालक दलाला ओलीस ठेवले होते. सुमित्रा नौकेने जहाज रोखून इराणी खलाशांसोबत नौकेची चाच्यांपासून मुक्तता केली होती.