इंडियन नेव्ही...कोल्हापूर आणि साळोखे बंधू
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरातील रावसाहेब आणि गुरूराज साळोखे. दोघे सख्खे भाऊ भारतीय नौसेनेत आहेत. विशेष म्हणजे ते वादक आहेत, अन् त्यांच्या स्वरांची कला सातासमुद्रापार पोहोचली आहे.
विशेष म्हणजे प्रजासत्ताकदिनी झालेल्या दिल्लीतील संचलनात रावसाहेब साळोखे यांनी नेव्हीच्या बँडपथकाचे नेतृत्व केले आहे. कोल्हापुरातील रावसाहेब आणि गुरुराज हे दोघे सख्खे भाऊ. कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय बँडवादनाचा. लग्न, मुंज, बारसे, वेगवेगळ्या मिरवणुकात साळोखे बँडचे वादक म्हणून हे दोघेही वडिलांच्या बँडपथकात. सनई-चौघडा वाजवायला रोज अंबाबाईच्या नगारखान्यात. पण या दोघांना त्यांचे हे सूर, त्यांची ही कला दूरवर पोहोचवायची होती. घडलेही तसेच. गुरुराज आणि रावसाहेब यांची निवड इंडियन नेव्हीच्या बँडपथकात झाली. आणि खरोखरच त्यांच्या सुरांची कंपने सातासमुद्रापार जाऊन पोहोचली.

आता गुरुराज साळोखे मुंबई इंडियन नेव्हीच्या बँडपथकात मुख्य वादक म्हणून आणि गुरुराज साळोखे कोचीनमध्ये पी.टी. सेंटरमधील नेव्हीच्या बँडचे प्रमुख आहेत. प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचालनात इंडियन नेव्हीच्या बँडपथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही रावसाहेब साळेखे यांनी पार पाडली. कोल्हापूरची माणसं कोठे कोठे आहेत, कोठे कोठे आपली कामगिरी दाखवत आहेत, याचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
बँडवादन ही एक कला आहे. कोणत्याही शिकवणीला न जाता अन्य वादकांच्या सहवासात राहून आणि नित्य सरावातून कोल्हापुरातील बँडपथक वाले शिकले आहेत. कोल्हापुरात पापाची तिकटी ते कुंभार गल्लीपर्यंत बँडपथकांच्या छोट्या -छोट्या खोल्या आहेत. किंबहुना ही गल्ली म्हणजेच बँड पथकाचे विद्यापीठ आहे. याच ठिकाणी रावसाहेब आणि गुरुराज साळोखे यांनी सुरांसोबत आपली वाटचाल सुरू केली. बँड पथक म्हणजे एखाद्या समारंभाची शान नक्कीच वाढवणारी. पण समारंभ संपला की बँडपथकाच्या वाट्याला उपेक्षा ठरलेली. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अशोक साळोखे या ज्येष्ठ वादकांनी आपल्या रावसाहेब आणि गुरुराज या दोन मुलांसाठी सुर संगीताची वेगळी वाट शोधली आणि खरोखरच या दोघांची संगीताच्या कामगिरीवर नियमित भरती झाली. इंडियन नेव्हीच्या बँडपथकात आपले सूर मिळून पथकाचा महत्त्वाचा घटकही ठरली.
इंडियन नेव्हीच्या बँड पथकाची मान आणि शान खूप मोठी आहे. या बँडची उपस्थिती नेहमीच्या सर्व कार्यक्रमात असते. या पथकाचे सूर आणि त्यांचे गणवेशातले तेज यामुळे हे पथक अशा समारंभाची शान आणखीनच वाढवते. भारतीय प्रजासत्ताक दिनात दिल्लीत राजपथावर जे संचलन होते, त्यात नेव्हीचे हे बँडपथक आपली वेगळी ओळख निर्माण करते. याशिवाय जगातील विविध देशात महत्त्वाच्या राजनैतिक कार्यक्रमात या बँडपथकाची उपस्थिती असते. या बँड पथकाला रोज सकाळी 10 ते 5 या वेळेत सराव करावा लागतो. पण हा ड्युटीचाच एक भाग असतो. याशिवाय त्या त्या प्रसंगानुसार नेव्हीच्या कामकाजात भाग घ्यावा लागतो. रावसाहेब, गुरुराज या दोघांचा त्यातही सहभाग असतो. त्यामुळे कधी नेव्हीच्या ऑफिसमध्ये तर कधी बोटीवरही त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते.
दोन्ही बंधूंना क्लोरोनेट, सॅक्साफोन, फ्लूट व कीबोर्डची सर्व वाद्ये वाजवता येतात. याशिवाय रावसाहेब साळुंखे हे स्वत: स्टाफ नोटेशन बनवतात. संगीताचे प्रतीक म्हणून असलेली जी नोटेशन्स वापरली जातात, ती नोटेशनच वादकांना दिशा देत असतात. नोटेशन मधील शब्द फक्त वादकांनाच कळू शकतात. किंबहुना वाद्य वृंदातील एखादे गीत वादकांना दिल्या जाणाऱ्या नोटेशनवरच सूर धरते. किंवा नोटेशनच्या आधारावरच सुरांना बोलते केले जाते.
- नगारखान्यातही सेवा
रावसाहेब आणि गुरुराज या दोघा बंधूंनी अंबाबाईच्या नगारखान्यातही सनई नगारा वादन करण्याची सेवा केली आहे. दिवसातून पाच वेळा अंबाबाई मंदिरातील नगारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावर नगारा वाजवण्याची खोली आहे. या दोघांनी कोरोनाच्या काळातही या आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. आता त्यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी ही सेवा देत आहे .