चाचेगिरीचा प्रयत्न पाडला हाणून एडनच्या आखातात भारतीय नौदलाची कामगिरी
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
एडनच्या आखातात भारतीय व्यापारी नौकेची लूट करण्याचा समुद्री चाच्यांनी केलेला प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. चाच्यांनी ‘एमव्ही गोल्डन आर्सनल’ नामक व्यापारी नौकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या नौकेवर एक भारतीय नाविक होता. संशयित चाच्यांनी या नौकेवर चढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या भारतीय नाविकाने भारतीय नौदलाला त्वरित सूचना केली. त्याआधी धोका ओळखून सर्व नाविकांनी नौकेवरील सुरक्षित कक्षात आश्रय घेतला. या प्रसंगावधानामुळे नौकेवरील सर्वजण सुरक्षित राहिले.
आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्धारे चाच्यांच्या हल्ल्याच्या प्रयत्नाची माहिती भारतीय नौदलाला देण्यात आली. नौदलाने त्वरीत ‘आयएनएस त्रिखंड’ ही युद्धनौका या व्यापारी नौकेच्या साहाय्यार्थ पाठवून दिली. भारतीय युद्धनौका या व्यापारी नौकेच्या जवळ पोहचताच सर्व चाच्यांनी समुद्रातून पळ काढला. त्यामुळे त्यांना व्यापारी नौकेवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. एमव्ही गोल्डन आर्सनल ही नौका महत्वाचा माल घेऊन भारताकडेच येण्यासाठी एडनच्या आखातातून प्रवास करत होती. तिचा धोका टळल्याने ती काही काळातच भारतीय बंदरावर पोहचणार आहे.
नौका आणि नाविक सुरक्षित
या नौकेवरचे सर्व नाविक आणि ही नौकाही पूर्णत: सुरक्षित आहे. चाच्यांचा प्रयत्न वेळीच उधळून लावल्याने ही व्यापारी नौका ताब्यात घेण्याचे चाच्यांचे प्रयत्न धुळीला मिळाले आहेत. या नौकेवरील नाविकांचे अपहरण करुन ही नौका लुटण्याची आणि नाविकांना ओलीस धरुन भारताकडून खंडणी घेण्याची चाच्यांची योजना असण्याची शक्यता आहे, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. एडनचे आखात आफ्रिका खंडाच्या पूर्व टोकाजवळ आहे. हे टोक आफ्रिकेचे ‘शिंग’ म्हणून ओळखले जाते. या प्रदेशात अनेकदा समुद्री चाचेगिरीचे प्रकार घडतात.
दोन वर्षांमध्ये अनेक प्रकार
गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय नौदलाच्या सजगतेने आणि सतर्कतेने चाचेगिरीचे अनेक प्रयत्न फसलेले आहेत. एडनच्या आखाताच्या प्रदेशातला हा धोका लक्षात घेऊन अरबी सागरात भारताने आपल्या अनेक युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. व्यापारी नौकेवरुन संदेश येताच भारताकडून त्वरित साहाय्यता पाठविण्यात आली आहे. यासाठी भारतीय नौदलाची प्रसंशा जगभरातून नेहमी केली जात असते.