ऑलिम्पियाड : भारतीय पुरुष, महिलांची विजयी घोडदौड चालूच
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय पुरुषांनी सर्बियावर, तर महिलांनी फ्रान्सवर मात करून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने सलग चौथा विजय मिळवून सर्बियाविऊद्धच्या सामन्यात भारताला सुऊवातीची आघाडी मिळवून दिली.
आर. प्रज्ञानंधाने काळ्या रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या अॅलेक्सी सरानाविऊद्ध लवकर बरोबरीत सामना सोडविण्याचा निर्णय घेतल्यावर अलीकडच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे चांगली कामगिरी करून दाखविण्याची जबाबदारी अर्जुनवर येऊन पडली होती. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने त्याच्या चाहत्यांना किंवा संघातील सहकाऱ्यांना निराश केले नाही आणि इंदजिक अलेक्झांडरविऊद्ध अचूक प्रतिहल्ला केला.
ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि डी. गुकेश यांनीही अनुक्रमे एव्हिक वेलीमीर आणि अलेक्झांडर प्रेडके यांच्याविऊद्ध निर्विवाद विजय मिळवून संघाला आणखी एक 3.5-0.5 असा विजय मिळवून दिला. महिला विभागात मात्र चारही पटांवर जोरदार संघर्ष करण्याचा प्रसंग भारतीय खेळाडूंवर आला. वरिष्ठ मानांकित डी. हरिकाने तिच्या अनुभवाचा उपयोग करून फ्रेंच प्रतिस्पर्धी डेमांटे डौलिते-कॉर्नेटवर मात केली, तर तानिया सचदेवने तिच्या प्रतिस्पर्ध्यावरील वेळेच्या दबावाचा फायदा घेत विजय नोंदविला.
आर. वैशालीचा फ्रान्सच्या सोफी मिलेटविऊद्धचा सामना बरोबरीत सुटला, तर मित्रा हेजाझीपूर आणि दिव्या देशमुख यांच्यातील सामनाही चुरशीचा ठरून त्यात पारडे सतत बदलत राहिले. त्याआधी तिसऱ्या फेरीत भारतीय पुऊषांनी हंगेरी ‘ब’ संघाला 3.5-0.5 अशा फरकाने पराभूत केले, तर महिला विभागात भारताने स्वीत्झर्लंडवर 3-1 असा विजय मिळविला.