For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरूष हॉकी संघाचा कोरियावर विजय

06:43 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरूष हॉकी संघाचा कोरियावर विजय
Advertisement

वृत्तसंस्था, काकामिगाहारा (जपान)

Advertisement

येथे सुरू असलेल्या 18 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील अ गटातील सोमवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार केतन कुशावहच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने कोरियाचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात कर्णधार कुशावहने 2 गोल नोंदविले.

सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात भारताने 2 गोल करुन कोरियावर आघाडी मिळविली होती. खेळाच्या तिसऱ्याच मिनिटाला कुशावहने भारताचे खाते उघडले. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार कुशावहने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. 5 व्या मिनिटाला राहुल यादवने कोरियाच्या बचावफळीला हुलकावणी देत कोरियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने कोरियाच्या गोलरक्षकाला चकवित भारताचा हा दुसरा गोल केला. सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाकडून आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्न झाला. पण त्यांना यश मिळाले नाही. दरम्यान 21 व्या मिनिटाला कोरियाचा कर्णधार युन जेयॉकने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने कोरियावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती.

Advertisement

सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत अखेरच्या काही मिनिटांत दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण त्याचा लाभ उठविता आला नाही. 36 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल कर्णधार केतन कुशावहने केला. 54 व्या मिनिटाला शाहरुक अलीने भारताचा चौथा गोल करुन कोरियाचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना चीन तैपेईबरोबर 3 जून रोजी होणार आहे. अ गटातील भारताचा हा शेवटचा सामना आहे.

Advertisement
Tags :

.