भारतीय पुरुषांची जर्मनीवर, तर महिलांची उझबेकिस्तानवर मात
वृत्तसंस्था, समरकंद : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या 46 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या नवव्या फेरीत विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेशच्या नेतृत्वाखालील भारतीय पुऊष संघाने जर्मनीवर 2.5-1.5 असा विजय मिळवला, तर महिला संघाने उझबेकिस्तानचा 3-1 असा धुव्वा उडवला. सामन्याच्या बहुतांश भागात गुकेशला संघर्ष करावा लागला, परंतु त्याने जोरदार पुनरागमन करत अलेक्झांडर डोन्चेन्कोव्हच्या पांढऱ्या राजाला चेकमेटच्या जाळ्यात अडकवले.
याच घडामोडीमुळे जर्मनीविरुद्ध पराभवाच्या छायेत असलेल्या भारतीय पुरुषांच्या बाजूने सामन्याचे पारडे फिरले. या विजयामुळे संघाची एकूण गुणसंख्या 15 झाली असून, जगातील या सर्वांत मोठ्या बुद्धिबळ महोत्सवात अजून दोन फेऱ्या बाकी असताना संघ पदकासाठीच्या शर्यतीत कायम आहे.
दरम्यान, खुल्या गटात अव्वल मानांकित अमेरिकन पुऊष संघाचा पराभव करून उझबेकिस्तानने सुवर्णपदक जवळपास निश्चित केले. नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह आणि नोदिरबेक याकुबोव्ह यांनी फॅबियानो काऊआना आणि हॅन्स मोके निमन यांच्याविऊद्ध निर्णायक विजय मिळवले; तर दुसऱ्या पटावर जावोखिर सिंदारोव्हचा वेस्ली सोकडून झालेला पराभव फारसा महत्त्वाचा ठरला नाही.
महिलांच्या गटात चिनी संघाने आर्मेनियन महिला संघावर 3-1 असा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले अग्रस्थान कायम राखले. चीनची एकूण गुणसंख्या 17 झाली असून, त्यांना आता त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यांवर, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे, दोन गुणांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे दहाव्या फेरीत भारत आणि चीन यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. खुल्या गटात स्थानिक उझबेक संघाचे पारडे जड दिसत असले, तरी महिलांच्या गटात भारतीय संघाकडे अजूनही संधी आहे. त्यासाठी त्यांना चीनविऊद्धचा संभाव्य निर्णायक सामना जिंकावा लागेल.
भारतीय पुरुषांचा विचार करता डोन्चेन्कोव्हविऊद्धचा सामना गुकेशसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पराभवाच्या उंबरठ्यावर असताना त्याने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. हा भारतीय खेळाडू पुन्हा एकदा एक जबरदस्त झुंजार खेळाडू म्हणून सिद्ध होत आहे आणि या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने विचार करता ही बाब त्याच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. इतर तीन सामने बरोबरीत सुटले. यात प्रज्ञानंदने व्हिन्सेंट कीमरशी, अर्जुनने मॅथियास ब्लूबाउमशी आणि निहाल सरीनने फ्रेडरिक स्वानशी बरोबरी साधली. महिलांच्या गटात मात्र भारतीय खेळाडूंसाठी परिस्थिती बरीच अनुकूल राहिली. दिव्या देशमुख आणि वर्तिका अग्रवाल यांनी सहज विजय मिळवले, तर हंपी आणि सविता श्री यांचे सामने बरोबरीत सुटले.