अमेरिकेत भारतीयाकडून कुटुंबाची हत्या
वृत्तसंस्था / लॉरेन्सव्हिली
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने आपली पत्नी आणि तीन कुटुंबियांची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, या कुटुंबातील तीन मुलांनी कपाटात लपून आपले जीव वाचविले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतल्या प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे जॉर्जियातील लॉरेन्सव्हिली शहरात ही भीषण घटना घडली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने गोळ्या घालून हे हत्याकांड घडविल्याचे दिसून येते.
आरोपीचे नाव विजय कुमार (वय 51) असे असून त्याने कौटुंबिक वादातून या हत्या केल्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. कुमार यांची पत्नी मिमू डोग्रा (वय 43), गौरव कुमार (वय 33), निधी चंदर (वय 37) आणि हरीश चंदर (वय 38) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विजय कुमार याने आपल्या तीन मुलांसमोरच गोळीबार करुन कुटुंबियांचे बळी घेतल्याचे दिसत आहे.
मुलाच्या कॉलमुळे वाचला जीव
शुक्रवारी पहाटे अडीच वाजता विजय कुमार यांच्या घरातून एका 12 वर्षांच्या मुलाने पोलिसांना दूरध्वनी केला. त्याने घरात घडत असलेल्या घटनेची माहिती देऊन साहाय्य मागितले. पोलिसांनी त्वरित घराकडे धाव घेतली. त्यावेळी विजय कुमार यांनी पत्नीसह तीन कुटुंबियांचा बळी घेतला होता. घरात केवळ 3 लहान मुलेच होती. दूरध्वनी आल्यानंतर काही मिनिटांमध्येच पोलिस घटनास्थळी पोहचले.
मुले सुखरुप
गोळीबार होताच मुलांनी कपाटात लपून आपले जीव वाचविले. पोलिस पोहचल्यानंतर त्यांनी मुलांना ताब्यात घेतले. मुले सुखरुप असून त्यांना काहीही जखमा झालेल्या नाहीत. यावरुन त्यांच्यावर गोळीबार झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे. सर्व मुलांची व्यवस्था सरकारी आश्रयस्थानी करण्यात आली आहे. दूरध्वनी केलेल्या मुलाच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे. या प्रकरणात आरोपीवर हत्या करणे आणि इतर आरोप ठेवण्यात आले असून तपास केला जात आहे.