जॉर्डन-इस्रायल सीमेवर भारतीयाची हत्या
कुटुंबीयांना खोटं सांगून घरातून पडला होता बाहेर
वृत्तसंस्था/ तेल अवीव
केरळमधील एका व्यक्तीची जॉर्डन-इस्रायल सीमेवर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी याविषयी माहिती दिली आहे. थुंबा येथील रहिवासी 47 वर्षीय एनी थॉमस गेब्रियल असे या मृताचे नाव आहे. 1 मार्च रोजी गेब्रियलच्या परिवाराला भारतीय दूतावासाकडुन एक ईमेल प्राप्त झाला होता, यात एनीच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. जॉर्डनमधील भारतीय दूतावासाकडून एनीच्या मृत्यूविषयी एक ईमेल मिळाला. परंतु त्यानंतर कुठलीच आणखी माहिती मिळाली नसल्याचे एनीच्या नातेवाईक मेटिल्डा यांनी सांगितले आहे. 10 फेब्रुवारी रोजी जॉर्डनच्या सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला होता.
गेब्रियलचा नातेवाईक एडिसनलाही गोळी लागली असून तो उपचारामुळे वाचला आहे. तो जखमी अवस्थेत घरी परतला. 5 फेब्रुवारी रोजी गेब्रियल घरात तामिळनाडूतील ख्रिश्चनांचे धार्मिक स्थळ वेलंकन्नी येथे जात असल्याचे सांगत बाहेर पडला होता. तर गेब्रियल आणि एडिसन हे एका एजंटच्या मदतीने जॉर्डनमधून इस्रायलची सीमा पार करणाऱ्या 4 जणांच्या समुहात सामील होते असे समजते.
जॉर्डनला कसे पोहोचले?
चारही जण तीन महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर जॉर्डन येथे पोहोचले होते. जॉर्डनच्या सैन्याने त्यांना सीमेवर रोखले, परंतु ते पळू लागताच सैनिकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. गेब्रियलच्या डोक्यात गोळी शिरली होती. तर एडिसनच्या पायाला ईजा झाली, जॉर्डनच्या सैन्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले, जेथील उपचारानंतर एडिसनला भारतात परत पाठविण्यात आले. यानंतरच गेब्रियलला परिवाराला तो जॉर्डन येथे गेला होता हे कळले होते. त्यानंतर दूतावासाच्या माध्यमातून त्यांना अधिकृतपणे गेब्रियलच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. गेब्रियलच्या मागे परिवारात त्याची पत्नी क्रिस्टीना आहे.