भारतीय न्यायव्यवस्थाच आरोपीच्या पिंजऱ्यात!
सावंतवाडी :
देशातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात कोट्यावधीच्या जळालेल्या नोटा आढळतात, हे पाहता कोणत्या दिशेने आपला न्यायवाद जातो, याचे उदाहरण आहे. सध्याची परिस्थिती पाहता आपली न्याययंत्रणा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे, हे मान्य करावे लागेल. मात्र, यातूनही वाट काढायची असेल तर भारतीय संविधानाचा आत्मा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. त्याचे पारायण केले पाहिजे. तरच आपला देश पुन्हा समृद्धीच्या दिशेने जाईल, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे आठ एप्रिलपासून स्वातंत्र सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर व्याख्यानमालेच्या निमित्ताने दरवर्षी श्रीराम वाचन मंदिरतर्फे जयानंद मठकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार खलप यांना जाहीर करण्यात आला होता.
खलप यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्राचार्य अल्ताफ खान उत्तम वाचक पुरस्कार कुडाळ महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर (सावंतवाडी) यांना तर प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार संजय वेतुरेकर (कुडाळ) यांना अॅड. नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे व पुरस्कार विजेते उपस्थित होते.
रमाकांत खलप पुढे म्हणाले. बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांचा वारसा जयानंद मठकर यांना लाभला होता. समाजवादी चळवळ ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारी चळवळ होती. यामध्ये समानतेला महत्त्व होते. परंतु आज समाजवादाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. समाजवाद जातीनिष्ठतेवरून धर्मनिष्ठतेवर आला आहे. विशिष्ट समाजात वावरणाऱ्या व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण सर्वजण ‘आम्ही भारतीय’ म्हणून संविधानानुसार शपथ घेतो, त्यावेळी प्रत्येकाच्या मनात जी भावना असते, त्या भावनेला अशा जाती-धर्माच्या भिंतीमुळे तडा पोहोचवत असतो.
आपल्याला जयानंद मठकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आला. मठकर यांचे कार्य मोठे होते. त्यांना समाजवादी नेत्यांचा वारसा लाभला होता. हे सर्व समाजवादी नेते पुस्तकांच्या संस्कारातून आणि आजुबाजूच्या थोर व्यक्तिमत्वांमुळे घडले होते, असेही खलप म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात जळालेल्या कोट्यावधीच्या नोटा सापडत आहेत. त्यामुळे आपली न्याययंत्रणा कुठल्या बाजूने जात आहे, हे दिसून येत आहे. आपण कायदा मंत्री होतो. त्यावेळी अनेकजण वशिलेबाजीसाठी येत होते. परंतु अशी वशिलेबाजी चालली नाही. परंतु आजच्या परिस्थितीत अशा घटना पाहिल्या तर आपली न्यायदेवता आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे मान्य करावे लागेल. अशा परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपण प्रत्येकाने संविधानाचा आत्मा समजून घेतला पाहिजे.
अॅड. दिलीप नार्वेकर यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात जळालेल्या नोटा आढळून आल्या. त्यामुळे आपली न्याययंत्रणा पोखरलेली असल्याची भावना जनमानसात आहे. आता आपल्याला न्याय मिळणार नाही. न्यायदेवतेला विकत घेतले जाऊ शकते, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत लोकांना आश्वस्त करण्याचे काम माजी कायदामंत्री आलेल्या रमाकांत खलप यांच्यासारख्या नेत्यांनी केले पाहिजे, असे सांगितले.
- वाचन मंदिरशी माझे जुने नाते!
डॉ. शरयू आसोलकर म्हणाल्या, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. मी सावंतवाडीत लहानाची मोठी झाले. वाचक पुरस्कार मिळणे मोठी गोष्ट आहे. आज वाचन संस्कृती कमी होत आहे. अशा परिस्थितीत या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. श्रीराम वाचन मंदिराशी लहानपणापासूनच स्नेहबंध आहेत. वडील मला या वाचन मंदिरात घेऊन आले. त्यानंतर या वाचन मंदिरशी कायम ऋणानुबंध जोडले गेले. अल्ताफ खान यांचे ग्रंथांवर प्रेम होते. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.
- पुरस्कार उभारी देणारा!
संजय वेतुरेकर यांनी सांगितले की, मला भरून आले आहे. जयानंद मठकर, प्रा. पांडुरंग येजरे सरांनी मला घडविले. कार्यकता शून्यातून निर्माण होत असतो. छात्रभारती आणि एनसयुआय यांच्यात संघर्ष झाला. परंतु त्या संघर्षात लोकशाही होती. मात्र, आजच्या काळात आंदोलने चिरडून टाकली जात आहेत. त्यामुळेच लोकशाहीसमोर संकट आहे. अशा काळात येजरे सरांच्या नावे मिळालेला कार्यकर्ता पुरस्कार उभारी देणारा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमेधा धुरी यांनी, प्रास्ताविक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. उपस्थितांचा परिचय व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याची ओळख अॅड. संदीप निंबाळकर यांनी करून दिली. यावेळी डॉ. जयेंद्र पऊळेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सतीश लळीत, प्रा. डॉ. जी. ए. बुवा, बाळ बोर्डेकर, समीर वंजारी, सखी पवार, सीमा मठकर, मिहीर मठकर आदी उपस्थित होते.