भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी
वृत्तसंस्था / इपोह (मलेशिया)
मोहम्मद राहीच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर येथे सुरू झालेल्या सुलतान अझलन शहा चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत भारताने बलाढ्या द. कोरियाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत विजयी सलामी दिली.
भारतीय हॉकी संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच यावेळी आपला सहभाग दर्शवित आहे. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी वेगवान आणि आक्रमक खेळावर अधिक भर देत द. कोरियाच्या बचावळफीवर चांगलेच दडपण आणले. दिलप्रित सिंगने दिलेल्या अचूक पासवर 15 व्या मिनिटाला मोहम्मद राहीलने भारताचे खाते उघडले. यानंतर भारताच्या मध्यफळीतील खेळाडू अभिषेक आणि कर्णधार संजय यांनी कोरियाच्या आघाडी फळीतील खेळाडूंना आक्रमणापासून चांगलेच थोपविले. भारताची बचावफळी भक्कम ठरल्याने द. कोरियाने शेवटपर्यंत प्रयत्न करुनही त्यांना आपले खाते उघडता आले नाही. द. कोरियाने ही स्पर्धा आतापर्यंत तीनवेळा जिंकली आहे. सामन्यातील चौथ्याच मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण तो वाया गेला. भारताने आतापर्यंत पाचवैळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2019 साली भारतीय हॉकी संघाने आपला शेवटचा सहभाग या स्पर्धेत नोंदविला होता आणि त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोरियाने त्यावेळी या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. 27 व्या मिनिटाला कोरियाला बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. पण भारतीय गोलरक्षकाने द. कोरियाचे हे आक्रमण थोपविले. मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यातील खेळाच्या तिसऱ्या सत्रामध्ये भारताने पुन्हा आक्रमणावर भर देत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण अभिषेकचा फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेल्याने भारताला आघाडी वाढविता आली नाही. निर्धारीत वेळेपेक्षा हा सामना सहा तास उशीरा झाला. कारण अचानक झालेल्या पावसामुळे मैदान ओलसर राहिले होते. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एकदा सामना करणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश असून सामना जिंकणाऱ्या संघाला तीन गुण तर अनिर्णीत सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल.