For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय हॉकी संघाचा सलग दुसरा पराभव

06:47 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाचा सलग दुसरा पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

Advertisement

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय पुरुष संघाला पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मालिकेतील रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत 2-0 अशी आघाडी मिळविली आहे.

या मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 असा पराभव केला होता. रविवारच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाला कडवी लढत दिली होती. मध्यंतरापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. दरम्यान खेळाच्या तिसऱ्या पंधरा मिनिटांच्या सत्रामध्ये भारताच्या बचाव फळीची कामगिरी निकृष्ट झाल्याने त्याचा फायदा यजमान ऑस्ट्रेलिया संघाने उठविला. ऑस्ट्रेलियातर्फे जेरेमी हेवर्डने साहाव्या आणि 34 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर 2 गोल केले. जेकॉब अँडरसनने 42 व्या मिनिटाला तसेच नाथन इप्रामुसने 45 व्या मिनिटाला मैदानी गोल करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारतातर्फे जुगराज सिंगने 9 व्या मिनिटाला तर कर्णधार हरमनप्रित सिंगने 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. भारतीय संघाचा कर्णधार हार्दीक सिंगने मधल्या फळीत खेळताना दर्जेदार कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 व्या मिनिटाला आपले खाते पेनल्टी कॉर्नरवर हेवर्डद्वारे उघडले. मात्र, त्यांना ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 9 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने भारताला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला केवळ काही सेकंद बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीत सिंगने आपल्या संघाचा दुसरा गोल नेंदविला. सामन्यातील उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या आघाडी फळीने भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले आणि त्यांना 34 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हेवर्डने ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. या सामन्यात पी. आर. श्रीजेशच्या जागी पाठककडे गोल रक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 42 व्या आणि 45 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने 2 मैदानी गोल केले. यानंतर मात्र, शेवटपर्यंत भारताला ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधता आली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगचा या सामन्यातील हा 180 वा गोल ठरला आहे. आता या मालिकेतील तिसरी कसोटी 10 एप्रिल रोजी खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.