For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक मोहीम आजपासून

06:55 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक मोहीम आजपासून
Advertisement

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेची सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारतीय पुरुष हॉकी संघ आज शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेची सुरुवात करणार असून त्यांचा समावेश ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे मागील स्पर्धेत मिळविलेल्या कांस्यपदकापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखविण्याकरिता त्यांना क्षमतेपेक्षा जास्त ताकद पणाला लावावी लागेल. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सामना सुरू होईल.

Advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून 41 वर्षांचा पदकांचा दुष्काळ दूर करण्यात यशस्वी ठरल्यानंतर भारतीयांकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय हॉकी संघाकडे विक्रमी आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके असून गेल्या वेळी जिंकलेल्या कांस्यपदकामुळे त्यांच्याकडून सलग दुसऱ्यांदा पदकप्राप्ती होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु ते सोपे आव्हान नाही.

कारण भारतीयांना सध्याचा चॅम्पियन बेल्जियम, बलाढ्या ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यासोबत कठीण ‘ब’ गटामध्ये समाविष्ट केले गेले आहे, तर गट ‘अमध्ये नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान फ्रान्स यांचा समावेश आहे. प्रत्येक गटामधून चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील.

न्यूझीलंडबरोबर अर्जेंटिना (29 जुलै रोजी) आणि आयर्लंड (30 जुलै) यांच्याविरुद्धचे भारताचे गटातील पहिले तीन सामने खूप महत्त्वाचे आहेत. कारण बेल्जियम (1 ऑगस्ट) आणि ऑस्ट्रेलिया (2 ऑगस्ट) यांचा सामना करण्यापूर्वी ते या सामन्यांमधून जास्तीत जास्त गुण मिळवू पाहतील. ही स्पर्धा म्हणजे हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ‘वॉल ऑफ इंडियन हॉकी’ म्हणून ओळखला जाणारा आणि दीर्घकाळ सेवा दिलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला योग्य निरोप देण्याची संधी आहे. या स्पधेंनंतर श्रीजेश निवृत्त होणार आहे.

16 सदस्यीय भारतीय संघात ऑलिम्पिक पदकविजेत्या संघाचा भाग राहिलेले 11 खेळाडू आहेत, तर जर्मनप्रीत सिंग, सुखजित सिंग, अभिषेक, राजकुमार पाल आणि संजय खेळात पदार्पण करत आहेत. श्रीजेश आणि मनप्रीत सिंग या दोघांचेही हे चौथे ऑलिम्पिक असून दीड दशकापासून ते संघाचे आधारस्तंभ राहिलेले आहेत. पुनर्बांधणीचा टप्पा सुरू केलेला भारत हळूहळू जगातील तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरला असला, तरी त्यांच्यात भल्याभल्यांना धक्का देण्याची क्षमता निश्चितच आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांना पहिल्या तीन सामन्यांचे महत्त्व चांगलेच समजले आहे आणि एकावेळी एका सामन्याची तयारी करण्यावर त्यांचा भर आहे.

Advertisement
Tags :

.