भारतीय हॉकी संघाचा पहिला पराभव, बेल्जियम विजयी
वृत्तसंस्था /पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारातील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान चॅम्पियन्स बलाढ्या बेल्जियमने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा खेळ दर्जेदार झाला. पण शेवटच्याक्षणी त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. भारतीय संघातील अभिषेकने 18 व्या मिनीटाला शानदार गोल करुन बेल्जियमवर आघाडी मिळविली होती. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ बेल्जियमवर 1-0 असा आघाडीवर होता. पण खेळाच्या उत्तरार्धात बेल्जियमने 2 गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. 33 व्या मिनीटाला बेल्जियमचे खाते टी. स्टॉकब्dरोक्सने तर 44 व्या मिनीटाला जॉन ड्युमेनने बेल्जियमचा दुसा गोल नोंदविला. भारतीय संघाला शेवटर्यंत आपला गोल नोंदविता आला नाही. या स्पर्धेत बेल्जियमचा संघ अद्याप अपराजित राहिला असून त्यांनी ब गटातून यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारताचा ब गटातील पुढील सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियाबरोबर शुक्रवारी खेळविला जाणार आहे. ब गटातून बेल्जियम आणि भारत यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. हरमनप्रितसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. तर अर्जेंटिनाने भारताला 1-1 असे बरोबरीत दुसऱ्या सामन्यात रोखले होते. ब गटातील भारताचा गुरूवारचा हा तिसरा सामना आहे.