भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
वृत्तसंस्था/इपोह (मलेशिया)
सुलतान अझलन शहा चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेल्व्हम कार्तीच्या निर्णायक गोलाच्या जोरावर भारतीय पुरूष हॉकी संघाने कडव्या न्यूझीलंडचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील बुधवारच्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारतातर्फे अमित रोहीदासने चौथ्या मिनिटाला, संजयने 32 व्या मिनिटाला तर सेल्व्हन कार्तीने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
न्यूझीलंडतर्फे जॉर्ज बेकरने 42 आणि 48 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये न्यूझीलंडच्या मध्यफळीतील खेळाडूंनी आक्रमक चढाया करत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारताची बचावफळी भक्कम असल्याने त्यांना आपले खाते उघडता आले नाही. सामन्यातील चौथ्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अमित राहीदासने या संधीचा फायदा घेत भारताचे खाते उघडले. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय गोलरक्षकाने तो थोपविल्याने न्यूझीलंडला सामन्याच्या मध्यंतरापर्यंत आपले खाते उघडता आले नव्हते. भारताने मध्यंतरावेळी न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती.
सामन्याच्या उत्तराधार्ताला प्रारंभ झाल्यानंतर खेळाच्या 32 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार संजयने या संधीचा फायदा घेत अचूक गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. सामन्याच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या सत्रामध्ये न्यूझीलंडला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण ते वाया गेले. 42 व्या मिनिटाला जॉर्ज बेकरने मैदानी गोल नोंदवून भारताची आघाडी थोडी कमी केली. 48 व्या मिनिटाला न्यूझीलंडला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जॉर्ज बेकरने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल करुन भारताशी बरोबरी साधली. सामना संपण्यास केवळ सहा मिनिटे बाकी असताना अभिषेकने दिलेल्या पासवर सेल्व्हम कार्तीने भारताचा तिसरा आणि निर्णायक गोल करत न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना कॅनडा बरोबर शनिवारी होत आहे.
मलेशिया पराभूत
या स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने यजमान मलेशियावर 4-3 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात भारतातर्फे सेल्व्हम कार्तीने सातव्या मिनिटाला, सुखजित सिंगने 21 व्या मिनिटाला, अमित रोहीदासने 39 व्या आणि कर्णधार संजयने 53 व्या मिनिटाला गोल केले. मलेशियातर्फे फैजल सारीने 13 व्या मिनिटाला, फित्री सारीने 36 व्या मिनिटाला आणि मेरहान जलीलने 45 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर भारताला तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. सुखजित सिंगने दिलेल्या पासवर सेल्व्हम कार्तीने मैदानी गोल करुन भारताचे खाते उघडले. भारताला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 13 व्या मिनिटाला भारतीय संघातील यशदीप सिवाचला पंचांनी हिरवे कार्ड दाखविले.