For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ घोषित

06:22 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ घोषित
Advertisement

राजकुमार पालचे पुनरागमन, हरमनप्रीत सिंगकडे नेतृत्व

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जपानमधील आइची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 20 सदस्यीय संघात केवळ 1 बदल करण्यात आला असून बुधवारी मिडफील्डर राजकुमार पाल याने युवा खेळाडू आदित्य अर्जुन लाळगेची जागा घेतली.

Advertisement

पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान न मिळालेल्या राजकुमार पालला आशियाई संघात घेण्यात आले आहे. त्याच्या जागी लाळगेला वगळण्यात आले, जो नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या 20 सदस्यीय संघात आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि हॉकी इंडियाच्या निवड समितीने विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघाच्या उर्वरित रचनेत कोणताही बदल केलेला नाही.

नेतृत्व आणि अनुभव

पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा स्टार डिफेंडर आणि ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग संघाचे नेतृत्व कायम ठेवेल. भारताकडून सर्वाधिक सामने खेळलेला अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंग संघाला अनुभव मिळवून देतो. या संघात प्रस्थापित स्टार्स आणि आश्वासक युवा खेळाडूंचा सुरेख संगम आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेला भारतीय संघ अत्यंत अनुभवी आहे. जपानमध्ये खेळण्याचे आव्हान स्वीकारण्यास आम्ही उत्सुक आहोत. कारण तिथे जिंकणारा संघ एलए 2028 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल आणि एक संघ व राष्ट्र म्हणून तेच आमचे अंतिम ध्येय आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले.

संघाची रचना आणि स्पर्धेचे स्वरुप

गोलकिपींग विभागात मोहित एच. एस. आणि सूरज करकेरा यांचा समावेश आहे. तर बचावफळीत जरमनप्रीत सिंग, कर्णधार हरमनप्रीत, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मिडफील्डची धुरा सांभाळण्यासाठी संघ राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत, निलकांता शर्मा आणि विवेक सागर प्रसाद यांच्यावर अवलंबून असेल. तर फॉरवर्ड फळीचे नेतृत्व दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग आणि अभिषेक करतील.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणाऱ्या भारताचा समावेश पूल ए मध्ये करण्यात आला आहे. या गटात यजमान जपानसह कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीचा भाग असलेल्या या महत्त्वपूर्ण आशियाई स्पर्धेत आपला संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीतला वाटतो. तो म्हणाला, ‘तरुण खेळाडू असोत किंवा अनुभवी, मला सर्व खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे की त्यांना मिळणाऱ्या संधीचा ते योग्य वापर करतील. मुख्य उद्देश म्हणजे दडपण न घेता खेळाचा आनंद घेणे आणि आपल्या जबाबदाऱ्या समजून घेणे.’

भारत आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर 22 सप्टेंबरला श्रीलंका, 24 सप्टेंबरला कोरिया, 26 सप्टेंबरला जपान आणि 28 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध समाने खेळून भारत पूल टप्प्यातील आपला प्रवास पूर्ण करेल.

भारतीय पुरुष हॉकी संघ : गोलरक्षक : मोहित एच. एस., सुरज करकेरा. डिफेंडर्स : जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच. मिडफिल्डर्स : राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद. फॉरवर्ड्स : दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक.

Advertisement
Tags :

.