भारतीय फुटबॉल संघाचा सामना आज मालदीवशी
वृत्तसंस्था/ थिम्पू
उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केलेले असल्यामुळे आज मंगळवारी येथे सॅफ 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालदीवचा सामना करताना भारताची नजर ‘अ’ गटातील अव्वल स्थानावर असेल. गेल्या शुक्रवारी त्यांच्या सुऊवातीच्या सामन्यात इश्फाक अहमदच्या मार्गदर्शनाखालील संघाने गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीतील सामन्याची पुनरावृत्ती घडविताना बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला होता. सुमित शर्मा ब्रह्मचरिमयुमने 92 व्या मिनिटाला तो विजयी गोल केला होता.
रविवारी बांगलादेश आणि मालदीव यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने भारत उपांत्य फेरीसाठी एक सामना बाकी असताना पात्र ठरला. अहमद यांनी सूचविले आहे की, यामुळे त्यांना वेगळ्या खेळाडूंना मैदानात उतरवून पाहता येईल आणि त्यांना सामन्याचा अनुभव देता येईल. ‘आम्ही आधीच पात्र झालो असल्यामुळे इतर खेळाडूंनाही खेळण्याची संधी मिळेल याची मला खात्री करायची आहे. आमचे सर्व खेळाडू महत्त्वाचे आहेत. काही त्रुटीही आहेत. आम्हाला हा सामना जिंकून गटात अव्वल स्थान मिळवायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.
‘अ’ गटातील परिस्थिती पाहता मालदीवला उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी बरोबरी आवश्यक आहे, तर भारत एकापेक्षा जास्त गोलांच्या फरकाने विजयी होईल, अशी आशा बांगलादेश बाळगून असेल. भारताने मालदीवविऊद्ध 1-0 ने विजय मिळविल्यास बांगलादेश आणि मालदीव यांच्यातून गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ निश्चित करण्यासाठी ‘डिस्प्लिनरी पॉईंट्स’ची मदत घ्यावी लागेल.
गट ‘अ’मधील पहिल्या स्थानावरील संघाला 28 सप्टेंबर रोजी पहिल्या उपांत्य सामन्यात ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाचा (भूतान, पाकिस्तान, नेपाळ किंवा श्रीलंका) सामना करावा लागेल. बरोबर 12 महिन्यांपूर्वी त्याच ठिकाणी सॅफ 16 वर्षांखालील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने मालदीवचा 8-0 असा पराभव केला होता. त्यात गोल नोंदविलेल्यांपैकी विशाल यादव, लेव्हिस झांगमिनलून, मानभाकुपर मलनगियांग, मोहम्मद कैफ आणि मोहम्मद अबशी हे पाच खेळाडू याही संघात आहेत.