सीमा ओलांडताना भारतीय कुटुंब ठार
वृत्तसंस्था / ओटावा
अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सीमारेषा ओलांडताना एका भारतीय कुटुंबातील चार जणांचा थंडीने काकडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. जगदीश पटेल, त्यांची पत्नी वैशालीबेन आणि त्यांची विहंग आणि धार्मिक या नावांची अनुक्रमे 11 आणि 3 वर्षे वयाची मुले यांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या प्रशासनाने दिली आहे. सीमेवरच्या उणे 38 तापमानाची कडाक्याची थंडी सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हे कुटुंब चालत सीमा पार करत होते. कित्येक तास चालल्यानंतर त्यांचे त्राण संपले. त्यांच्याकडील अन्नाचा साठा संपला आणि काही काळातच त्यांचा थंडीने मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास अमेरिकेच्या पोलिसांकडून केला जात आहे. हे कुटुंब कॅनडातून अमेरिकेत येत होते. अमेरिकेच्या मिनॅसोटा प्रांताच्या सीमेवर थांबविण्यात आलेल्या एका व्हॅनकडे हे कुटुंब जात होते, असे तपासात आढळल्याची माहिती देण्यात आली. स्थलांतरीतांची मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या या भागात असून त्यांच्या माध्यमातून हे कुटुंब अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे.