भारतीय शिक्षणपद्धतीने जगात आघाडी घ्यावी!
पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : वाराणसीत चर्चासत्राचे उद्घाटन : देशभरातील 300 हून अधिक शिक्षणतज्ञ सहभागी
वाराणसी / वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये एका शैक्षणिक चर्चासत्राचे उद्घाटन झाले आहे. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात बदल करणे अपेक्षित असून भारत त्यादृष्टीने योग्य पावले उचलत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी याप्रसंगी केले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे क्रियान्वयन कसे करावे, या संबंधी या चर्चासत्रात विचार मांडण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील 300 हून अधिक शिक्षणतज्ञ सहभागी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
आपली तरुणाई कुशल, आत्मविश्वासू, व्यावहारिक आणि गणनाक्षम असावी, यासाठी शिक्षण धोरण व्यापक संकल्पना राबवत आहे. आज भारत जगातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनली आहे. अंतराळ तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात, जिथे आधी फक्त सरकार सर्व काही करत असे, आता खासगी संस्थांच्या आणि तज्ञांच्या सहभागाच्या माध्यमातून तरुणांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या शैक्षणिक धोरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणायच्या उद्देशाने सरकारचे हे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकताना त्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारावे लागेल, असे ते म्हणाले. 2014 पासून देशातील महाविद्यालयांची संख्या 55 टक्क्मयांनी वाढली आहे. देशात केलेल्या अनेक प्रयत्नांमुळे आपल्या देशातील शैक्षणिक संस्थांनाही जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये स्थान मिळू लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ या नावाने हे चर्चासत्र ओळखले जात आहे. भारताच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये नव्या शिक्षा धोरणाचे क्रियान्वयन कसे होत आहे, कशी धोरणे लागू केली जात आहेत, अनुभव कसे आहेत, इत्यादींवर या चर्चासत्रात प्रकाश टाकला जाणार आहे. या धोरणाचा अवलंब कोणाला कसा लाभदायक ठरला, आणि कोण कशा प्रकारे यशस्वी झाले, याचेही अवलोकन करण्यात येणार आहे. 2020 मध्ये हे नवे धोरण आणण्यात आले आहे.
विद्यापीठांचे उपकुलगुरु उपस्थित
हे चर्चासत्र केंद्रीय शिक्षण विभागाने विद्यापीठ अनुदान आयोग आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे. त्यात विविध विद्यापीठांचे उपकुलगुरु, संचालक, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योगजगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये नवे शिक्षण धोरण प्रायोगिक तत्त्वावर अनेक स्थानी यशस्वीरित्या लागू करण्यात आले आहे. आता त्याचा प्रसार आणि विस्तार संपूर्ण भारतभर करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
‘अक्षयपात्र’ योजनेचे उद्घाटन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसरा विजय झाल्यापासूनची पंतप्रधान मोदींची ही प्रथमच वाराणसी भेट आहे. हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी येथे उत्तर प्रदेश सरकारच्या ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह आहार योजनेचे उद्घाटन केले. तसेच, पायाभूत सुविधा विकास आणि जीवनसुलभता योजनांची कोनशीलाही त्यांच्या हस्ते प्रस्थापित केली गेली. एकंदर 1,774 कोटी रुपयांच्या या योजना आहेत, अशी माहिती देण्यात आली.