भारतीय अर्थव्यवस्था 6.5 ते 7 टक्क्यांनी वाढणार
मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन :2024-25 साठीचा अंदाज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आधारावर 6.5 ते 7 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता हा विकास दर कौतुकास्पद असल्याचे मत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीइए) अनंत नागेश्वरन यांनी शुक्रवारी मांडले.
ते बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (बीसीसीआय) द्वारे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा विकास दर वास्तविक अर्थाने 6.5 टक्के असेल. ‘भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात सतत 6.5 ते 7 टक्के विकास दरासह सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. सध्याच्या जागतिक संदर्भात ही खूप चांगली कामगिरी आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जग मध्यमकालीन अनिश्चिततेचा सामना करत असताना आणि जागतिक व्यापार मंदावत असताना, भारत सरकारने स्वीकारलेल्या संतुलित आर्थिक आणि आर्थिक धोरणांमुळे कोविड-19 या जागतिक महामारीच्या परिणामातून उत्तमपणे सावरला आहे.
जागतिक महामारीच्या प्रभावातून भारताने आपली सुटका सहीसलामत करुन घेतली आहे. अर्थव्यवस्था मजबुतपणे कार्यरत असून देशात आर्थिक स्थिरता कायम राखण्यात यश आले आहे. चालू खात्यातील शिल्लक बऱ्यापैकी राहिली आहे.
ते म्हणाले, ‘व्यापक निर्देशक स्थिरता दर्शवतात. भांडवली खर्चात आमूलाग्र बदल झाला आहे, बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे आणि किरकोळ महागाई कमी झाली आहे’.